Pune News : दिव्यांग सहायता अभियानात 1200 हून अधिक दिव्यांगांना 1750 कृत्रिम साहित्यांचे वाटप

पुणे : ‘सेवा हाच संकल्प’ या ब्रीदवाक्याला प्रत्यक्षात उतरवत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १२०० हून अधिक दिव्यांगांना १७५० पेक्षा अधिक कृत्रिम अवयव आणि सहाय्यक साहित्यांचे वितरण करण्यात आले. ‘सेवा पंधरवडा’ अंतर्गत केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या पुढाकाराने हा हृदयस्पर्शी उपक्रम स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर पार पडला.
या शिबिरात दिव्यांग बांधवांसाठी विविध प्रकारचे सहाय्यक उपकरणे, कृत्रिम अवयव, कानांचे यंत्र, चालण्यासाठी सहाय्य करणारी साधने, इलेक्ट्रिक व्हीलचेअर्स आणि विशेषतः अंधांसाठी स्मार्ट फोन वाटप करण्यात आले. लाभार्थ्यांची पूर्वनोंदणी, उपकरणांचे मोजमाप, तांत्रिक चाचण्या यामुळे वितरण प्रक्रिया सुलभ झाली. शिबिरात दिव्यांगांच्या चेहऱ्यावर उमटलेला आत्मविश्वास आणि आनंद हा या उपक्रमाच्या यशाची साक्ष ठरला.
या कार्यक्रमाला माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, आमदार हेमंत रासने, पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम, विमानतळ प्राधिकरणाचे वाय. के. गुप्ता, संतोष ढोके, एअरपोर्टचे सरबजीत सिंग, भाजपा शहराध्यक्ष धीरज घाटे, कर्णबधीर भाषा दुभाषी माधुरी गाडेकर, अमोल शिंगारे आदी मान्यवरांसह शेकडो दिव्यांग बांधव उपस्थित होते.
केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले, “पंतप्रधान मोदी हे केवळ भारताचे नेतृत्व करत नाहीत, तर ते सेवाभावाचे प्रतीक आहेत. त्यांच्या कार्यपद्धतीत ‘सत्ता ही सेवेची संधी आहे’ हा दृष्टिकोन सातत्याने दिसतो. या शिबिरातून दिव्यांग बांधवांना केवळ सहाय्यक साधनेच नव्हे, तर सन्मान, आत्मविश्वास आणि जगण्याची नवी उमेद मिळाली.”
ते पुढे म्हणाले, “सलग तीन वर्षांपासून दिव्यांगांसाठी हे शिबिर घेतले जाते. भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या सीएसआर निधीतून हा उपक्रम राबवण्यात आला. पंतप्रधानांना शुभेच्छा देण्यासाठी ७५ हजार विद्यार्थी पत्रे लिहिणार आहेत. दिव्यांगांच्या शुभेच्छांमुळे पंतप्रधानांना आणखी जोमाने काम करण्यासाठी बळ मिळेल.”
प्रकाश जावडेकर यांनी म्हटले, “पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त देशभरात लाखो कार्यक्रम होत आहेत. मात्र हा कार्यक्रम विशेष आहे. पंतप्रधान मोदींनी ‘अपंग’ हा शब्द वापरण्याऐवजी ‘दिव्यांग’ असा सन्मानपूर्वक उल्लेख केला. सर्व दिव्यांग बांधवांना न्याय देणे हेच त्यांचे उद्दिष्ट आहे.”
महापालिका आयुक्त म्हणाले, “केंद्र, राज्य आणि स्थानिक स्तरांवर दिव्यांगांसाठी अनेक उपक्रम सुरू आहेत. या कार्यात खाजगी संस्थांनीही सहभागी व्हावे, ही अपेक्षा आहे.” कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हर्षल दारकुंडे यांनी केले.





