पुणे – क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील उड्डाणपूलाचे काम 1 जानेवारीपासून सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी, पुढील दहा दिवसांत महापालिकेकडून कामात अडथळा ठरणाऱ्या सेवा वाहिन्या हटविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून डीपीनुसार हा रस्ता विद्यापीठ सर्कल ते सेनापती बापट रस्त्याच्या सुरुवातीपर्यंत 45 मीटर रूंद केला जाणार आहे. या उड्डाणपूलाचे काम तातडीने सुरू करण्यासाठी शुक्रवारी महापालिकेत बैठक पार पडली. यात हे निर्णय घेण्यात आले. “पीएमआरडीए’ आयुक्त सुहास दिवसे, वाहतूक पोलीस उपायुक्त राहूल श्रीरामे, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमणार यांच्यासह पालिकेच्या भूसंपादन, पथ, ड्रेनेज तसेच पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी उपस्थित होते. “पीएमआरडीए’कडून हा बहुमजली पूल उभारला जाणार आहे. त्यातच, हा विद्यापीठ चौक शहराच्या पश्चिम भागातील औंध, बाणेर, बालेवाडी या भागांसह पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीकडे जाणाऱ्या वाहनांसाठी महत्त्वाचा चौक आहे. या चौकात शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रोचा मार्ग असल्याने या ठिकाणी बहुमजली उड्डाणपूल उभारला जाणार आहे. मात्र, हे काम सुरू केल्यानंतर गणेशखिंड रस्ता, तसेच औंध,बाणेर, पाषाण रस्ता परिसरात वाहतूक कोंडी होणार आहे. सर्व विभागांकडून समन्वय ठेवून काम सद्य:स्थितीत हा रस्ता 36 मीटरच आहे. त्यामुळे पुलाच्या कामासाठी बॅरिकेडिंग केल्यास वाहतुकीसाठी दोन लेन कमी पडणार असल्याने हा रस्ता 45 मीटर रुंद करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. याशिवाय या रस्त्याच्या खाली महावितरणच्या काही भूमिगत वाहिन्या, महापालिकेचा पाण्याचा व्हॉल्व्ह तसेच काही सेवा वाहिन्याही असून त्या दूर करणे आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेऊन सर्व विभागांमध्ये समन्वय ठेऊन प्रत्येक विभागाने आपली कामे पूर्ण करण्याचा निर्णय बैठकीत घेतला.