उच्चशिक्षित आणि तरुण उमेदवारांना दिली उमेदवारी पुणे – उच्चशिक्षित आणि तरुण उमेदवारांना संधी देऊन शहर काँग्रेसने शहरात नवसंजीवनी मिळविण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी विद्यमान दहा नगरसेवकांबरोबरच सात डाॅक्टर, ११ वकील आणि सहा प्राध्यापकांना उमेदवारी असून, एकूण जागांपैकी ५० टक्के जागांवर तरुण उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले आहेत. महाविकास आघाडीतील जागावाटपात पाचपेक्षा जास्त प्रभागांत चारही जागा काँग्रेसला मिळाल्या आहेत. जेथे कार्यकर्ते पक्ष सोडून अन्य पक्षांत गेले, त्या जागांवर नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे शंभरहून जास्त जागांवर काँग्रेसचे उमेदवार उभे आहेत. महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष बाहेर पडल्यानंतर काँग्रेसने शिवसेनेला सोबत घेऊन रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार जागांचे वाटप केले. एकेकाळी काँग्रेसच्या तिकिटासाठी अनेक इच्छुकांनी मारामाऱ्या, तोडफोडही केली आहे. मात्र, पक्षाची सध्याची परिस्थिती पाहता त्यांना सोडून जाणाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे. पक्षांतर्गत दुफळीचे प्रदर्शनही अनेकदा झाले आहे. या पार्श्वभूमीवर पक्षाने योग्य ती खबरदारी घेत उमेदवारांना बोलावून त्यांना एबी फाॅर्मचे वाटप केले. पक्षात नगरसेवक राहिलेले रफीक शेख, अविनाश बागवे, ॲड. चंद्रकांत कदम यांच्यासह विधानसभा निवडणुकीत शिवसेनेतून परत पक्षात आलेल्या ॲड. अविनाश साळवे, राजू पवार, एमआयएमच्या माजी नगरसेविका अश्विनी लांडगे, माजी नगरसेविका चांदबी नदाफ यांची सून सुरय्या नदाफ, संजय बालगुडे यांची पत्नी संजीवनी बालगुडे, माजी नगरसेवक बापू पाटोळे यांचे चिरंजीव रवी पाटोळे, माजी नगरसेविका लता राजगुरू यांचे पुत्र कुणाल राजगुरू यांना संधी देण्यात आली आहे. यंदा प्रथमच अविनाश बागवे यांच्या पत्नी इंदिरा बागवे यांना एकाच प्रभागातून उमेदवारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस सोडून नव्याने पक्षात दाखल झालेले प्रशांत जगताप यांच्या मातोश्री रत्नप्रभा जगताप याही रिंगणात उतरल्या आहेत. माजी नगरसेवक शिवाजी केदारी यांचे चिरंजीव साहिल केदारी यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. संदीप बालवडकर, निरंजन दाभेकर, ॲड. नितीन परतानी, सईद सय्यद, समाधान शिंदे, ॲड. रफिक शेख, डॉ अतुल देवळणकर,ॲड. रमेश पवळे, मेहबूब नदाफ, प्रवीण करपे, अक्षय जैन, ॲड. वंदना कडू, राज जाधव, जीवन चाकणकर, भूषण रानभरे, नयना सोनार, सन्मित्र बँकेचे चेअरमन गणेश फुलारे, मोहसीन खान, दीपाली संतोष ढोक यांना पक्षाकडून नव्याने संधी देण्यात आली आहे.