Pune : गरजू रुग्णांना योजनांचा लाभ द्यावा – मंत्री आबिटकर

पुणे – धर्मादाय संस्थांच्या कायद्यांअंतर्गत नोंदणीकृत रुग्णालयांनी आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनांचा गरजू रुग्णांना तत्परतेने लाभ देण्यासाठी पुढाकार घ्यावा, या कायद्यांअंतर्गत नोंदणीकृत न झालेल्या रुग्णालयांनी नोंदणी करून घ्यावी, त्यासाठी सहकार्य करण्यात येईल, असे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले.
यशदा येथे आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनांबाबत आढावा बैठकीत ते बोलत होते. या वेळी आमदार कैलास पाटील, आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश शेटे, राज्य आरोग्य हमी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अण्णासाहेब चव्हाण, आरोग्य उपसंचालक डॉ. कैलास बाविस्कर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागनाथ यमपल्ले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई आदी उपस्थित होते.
आबिटकर म्हणाले, या आरोग्य योजना नागरिकांच्या आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाच्या आहेत. धर्मादाय संस्थाच्या कायद्यांअंतर्गत जिल्ह्यात विविध रुग्णालये नोंदणीकृत असून, त्यांनी रुग्णांना सकारात्मक पद्धतीने मदत करून त्यांची सेवा करण्यासाठी पुढाकार घ्यावा. पुणे जिल्ह्यातील रुग्णांची संख्या, तसेच वैद्यकीय उपचारासाठी येणाऱ्या खर्चाचा विचार करता धर्मादाय रुग्णालयांवर मोठी जबाबदारी आहे. त्यामुळे गरजू रुग्णांना गुणवत्तापूर्ण वैद्यकीय सेवा देण्यासाठी काम करावे.
डॉ. शेटे म्हणाले, शासनाच्या आरोग्यविषयक योजनांचा प्रत्येक गरजू रुग्णांना लाभ देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. त्यामुळे रुग्णालयांनी पात्र रुग्णांना दर्जेदार आरोग्यसेवा देऊन सहकार्य करावे. या कामात हलगर्जीपणा होणार नाही, याबाबत व्यवस्थापनाने दक्षता घ्यावी.
तत्परतेने काम करा
धर्मादाय रुग्णालयांनी निर्धन व दुर्बल घटकातील रुग्णांसाठी प्रत्येकी १० टक्के याप्रमाणे एकूण २० टक्के खाटा आरक्षित करणे बंधनकारक असून, त्याअनुषंगाने धर्मादाय संस्थाच्या कायद्यांअंतर्गत नोंदणीकृत रुग्णालयांनी तत्परतेने काम करावे, शासनाच्या निर्देशाप्रमाणे रुग्णांना खाटा उपलब्ध करून द्याव्यात, असेही मंत्री आबिटकर यांनी सांगितले.





