Pune: टक्का साठीजवळ, उमेदवारांना धडकी

पुणे – कसबा विधानसभा मतदारसंघात यंदा मतदानाचा टक्का साठीपार झाल्याने उमेदवारांची धडधड वाढली आहे. त्यामुळे मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने असणार, हे पाहणे औत्सुक्याचे आहे.
२०१४ मध्ये येथे ६१.५७ टक्के मतदान झाले होते. दरम्यान, यंदाही शहरातील आठही मतदारसंघांत कसब्याचे मतदान सर्वाधिक आहे. तत्कालीन आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे येथे २०२२ मध्ये पोटनिवडणूक झाली. त्यावेळी ५०.०६ टक्के मतदान झाले. सहा महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणुकीत येथील मतदान हे ५९.२४ टक्के होते. आता महाविकास आघाडीला कौल मिळणार की महायुतीला?, मनसे किती मते घेणार या सगळ्या चर्चा दिवसभर सुरू होत्या.
कसबा मतदार संघ हा कॉस्मोपॉलिटिन मतदार संघ आहे. येथे गावठाणाचा भाग, तेवढाच पेठांचाही भाग आहे. येथील मतदार संख्याही कमी आहे. भाजपचा बालेकिल्ला असे या मतदार संघाला म्हटले जात होते. मात्र, पोटनिवडणुकीत याला धक्का बसला आणि कॉंग्रेसच्या पारड्यात ही जागा गेली. दरम्यान, मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या अनेकांनी मतदान उरकून घेतले.
यानंतर अनेकांनी एकत्रच नाश्त्याच्या आनंद लुटला. दुपारी एकपर्यंत मतदरांचा फ्लो कायम होता. दुपारी दोन वाजता हा वेग कमी झाला. त्यानंतर सायंकाळच्या सत्रात शनिवार, सदाशिव, नारायण पेठेबरोबरच महात्मा फुले पेठ, रविवार पेठ, गुरुवार पेठ, राजेंद्रनगर, नवीपेठ आणि शुक्रवार पेठेतील मतदार केंद्रांवर मतदारांच्या रांगा होत्या. सायंकाळी महात्मा फुले पेठ, भवानी पेठेचा काही भाग आदी भागांमधील मतदान केंद्रांत गर्दी झाली. काही केंद्रात सहानंतरही मतदान प्रक्रिया सुरू होती.
मशिन बंद, काहीकाळ संभ्रम
कसबा विधानसभा मतदार संघात पाच ठिकाणी मॉक पोल झाल्यानंतर मशिन बंद पडल्याच्या घटना घडल्या. त्यामुळे सुमारे २० मिनिटे ते अर्धातास मतदानाला उशीर झाला. नारायण पेठेतील गोगटे प्रशालेत मॉक पोलिंग नंतर अॅड्रेस टॅग व्यवस्थित न बांधले गेल्याचे दिसून आल्याने ते पुन्हा बांधण्यात आले, त्यानंतर ७.२१ वाजता मतदान सुरू करण्यात आले. या गोष्टी नागरिकांना माहिती नसल्याने मशिन बंद पडली, अशी कुजबुज सुरू झाली आणि या केंद्रांवर काहीकाळ संभ्रम निर्माण झाला.
तक्रारी फेटाळल्या
काही पोलिंग बुथवर महाविकास आघाडीने छत्रपती शिवाजी महाराज आणि संविधानाची फ्रेम ठेवली होती. तर महायुतीच्या कार्यकर्त्यांनी भगव्या टोप्या परिधान केल्या होत्या. या विषयीची तक्रार करण्यात आली, परंतु त्यावर आक्षेप घेता येत नाही, असा निर्वाळा निवडणूक अधिकाऱ्यांनी दिल्याने विरोधकांना गप्प बसावे लागले.
वेळ आणि मतदानाचा टक्का
स. ७ ते ९.०० – ७.४४
९ ते ११.०० – १८.३३
११ ते १.०० – ३१.६७
१ ते ३.०० – ४३.०३
दु. ३ ते ५.०० – ५४.९१
सायं. ६.०० – ५८.७६





