PUNE: एनडीए चौक सुरक्षित, सुसह्य असावा; खासदार सुप्रिया सुळे यांची पाहणी

पुणे – एनडीए चौकात पादचाऱ्यांसाठी सुरक्षित मार्ग असावा. कोणता रस्ता कुठे जातो याचे दिशादर्शक फलक नागरिकांना समजेल आणि संभ्रमावस्था होणार नाही असे लावावे. प्रवासी वाहतूक कुठे थांबणार, नागरिकांनी कुठे थांबायचे, याबबतचे फलकही असावेत, अशा सूचना खासदार सुप्रिया सुळे यांनी एनएचएआयच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
त्याबाबत केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनाही निवेदन देण्यात येणार असल्याचे सुळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
एनडीए चौकातील प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर येथील वाहतूक व्यवस्था कशी चालते, कोणत्या अडचणी येतात याबाबतची पाहणी करण्यासाठी आणि नागरिकांना अडचणी समजून घेण्यासाठी खासदार सुळे येथे आल्या होत्या. यावेळी “एनएचएआय’चे अधिकारी भारत तोडकरी, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सविता दगडे, माजी नगरसेवक सचिन दोडके, सायली वांजळे, युवक अध्यक्ष कुणाल वेडेपाटील, काका चव्हाण, कोथरूड विधानसभा अध्यक्ष स्वप्नील दुधाने, त्रिंबक मोकाशी, गिरीश गुरनानी, राजेंद्र उभे यासह पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.
एनडीए चौकातील कामाबाबतही दर दोन ते तीन महिन्यांनी आढावा घेत असे. आता येथील प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यामुळे नितीन गडकरी यांचे आभार मानते. या कामामध्ये स्थानिकांसह अन्य पदाधिकाऱ्यांनी पाठपुरावा केला. विशेषत: सचिन दोडके यांचेही योगदान असून, वडगाव येथील कामासंदर्भातही आम्ही गडकरी यांची भेट घेतली. त्याही कामाला लवकरच सुरवात होईल, असे सुळे यांनी सांगितले.
दादांचा प्रश्न योग्यच
ठाणे येथील रुग्णालयात झालेल्या मृत्यूंप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना कोंडीत पकडले असे सुप्रिया सुळे यांना विचारले असता, “घडलेली घटना दुर्दैवी आहे. दादांनी उपस्थित केला प्रश्न हा महाराष्ट्राच्या मनातील प्रश्न आहे.’ तसेच वारजे येथे विकासकामाच्या श्रेयवाद पेटला असे विचारले असता, देशात महागाई, बेरोजगारी, कांदा, टोमॅटो याचे प्रश्न मोठे आहेत. त्याकडे जास्त लक्ष दिले तर जनतेचे आशीर्वाद मिळतील, असे सल्ला सुळे यांनी दिला.





