Pune Navratri Festival : पुण्यातील नवरात्र मंडळांसाठी स्पर्धांचे आयोजन; 75 हजारांहून अधिक रुपयांची बक्षिसे
Pune Navratri Festival : पुण्यातील नवरात्र मंडळांसाठी श्री महालक्ष्मी मंदिर सारसबागतर्फे प्रथमच स्पर्धेचे आयोजन. प्रवेश विनामूल्य असून 75 हजारांहून अधिक रुपयांची पारितोषिके दिली जाणार.

Pune Navratri Festival : पुणे शहरातील नवरात्र उत्सव मंडळांसाठी ‘श्री महालक्ष्मी मंदिर सारसबाग-नवरात्रोत्सव स्पर्धे’चे यंदा प्रथमच आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. या स्पर्धेत धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांसह मंडळाच्या वर्षभरातील कामाचे परीक्षण केले जाणार आहे.
मंदिर ट्रस्टचे प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल आणि प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल यांनी ही माहिती दिली. पुणे शहरातील नवरात्र उत्सव मंडळांना या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. स्पर्धेसाठी परीक्षण मंडळाची नियुक्ती करण्यात आली असून ट्रस्टचे विश्वस्त अॅड. प्रताप परदेशी, ज्येष्ठ शिल्पकार विवेक खटावकर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा त्यात समावेश आहे.
स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या मंडळाला 21 हजार रुपये आणि सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांकाला 15 हजार रुपये आणि सन्मानचिन्ह, तर तृतीय क्रमांकाला 11 हजार रुपये आणि सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. तसेच तीन उत्तेजनार्थ क्रमांकांना प्रत्येकी 5 हजार रुपये आणि सन्मानचिन्ह दिले जाणार आहे. एकूण 75 हजार रुपयांहून अधिक रकमेची पारितोषिके देण्यात येणार आहेत.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी मंडळांनी 7770076767 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन ट्रस्टने केले आहे.





