Pune Nashik Railway: पुणे जिल्ह्याला मोठा धक्का! पुणे–मंचर–नाशिक रेल्वे मार्ग अखेर रद्द; रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती
Pune Nashik Railway: खेड, आंबेगाव, जुन्नर, अकोले, संगमनेर, सिन्नर परिसरातील औद्योगिक आणि ग्रामीण विकासाला मोठा धक्का; रेल्वे मंत्रालयाच्या निर्णयामुळे नागरिकांमध्ये असंतोष.

Pune Nashik Railway – पुणे–मंचर मार्गे नाशिक प्रस्तावित रेल्वे मार्ग आर्थिकदृष्ट्या परवडणारा नसल्याचे कारण देत रेल्वे मंत्रालयाने हा प्रकल्प रद्द केल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिल्याने खेड, आंबेगाव, जुन्नर, अकोले, संगमनेर, सिन्नर आणि नाशिक परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. गेल्या तीन दशकांपासून या रेल्वे मार्गाबाबत विविध स्तरांवर पाठपुरावा सुरू होता. काही ठिकाणी भूसंपादनाची प्रक्रिया देखील पार पडली होती.
रेल्वेमुळे ग्रामीण व औद्योगिक क्षेत्रांना चालना मिळेल, वाहतूक सुलभ होईल तसेच रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली होती. मात्र, आता प्रकल्प रद्द झाल्याने या भागाच्या विकासाला मोठा धक्का बसल्याची भावना व्यक्त होत आहे. उद्योग, पर्यटन, शेतीमाल वाहतूक आणि शैक्षणिक क्षेत्रासाठी हा रेल्वे मार्ग महत्त्वाचा मानला जात होता.
त्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधी, विविध संघटना आणि कृती समित्यांनी केंद्र सरकारने या निर्णयाचा पुनर्विचार करावा, अशी मागणी केली आहे. दरम्यान, रेल्वे मार्ग पुन्हा मंजूर व्हावा यासाठी लोकप्रतिनिधींसह नागरिकांनी एकत्रितपणे लढा उभारण्याची भूमिका घेतली असून पुढील काळात आंदोलनाची दिशा निश्चित केली जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
“पुणे–मंचर–नाशिक रेल्वे हा केवळ वाहतुकीचा प्रकल्प नव्हता, तर संपूर्ण प्रदेशाच्या विकासाचा कणा होता. हा निर्णय दुर्दैवी असून रेल्वे मार्ग पुन्हा मंजूर व्हावा यासाठी सर्व स्तरांवर पाठपुरावा सुरू ठेवणार आहे.”
– दिलीप वळसे पाटील,आमदार.
“तीन दशकांपासून नागरिकांनी रेल्वेची वाट पाहिली. भूसंपादनासह अनेक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रकल्प रद्द करणे अन्यायकारक आहे. केंद्र सरकारने तातडीने पुनर्मूल्यांकन करून रेल्वे मार्गाला नव्याने मंजुरी द्यावी.”
– राजेंद्र चौधरी,उपाध्यक्ष पुणे-नाशिक रेल्वे कृती समिती खेड.





