Manchar : चासकमान, कुकडी, डिंभेतून तातडीने आवर्तन सोडा
Manchar : संकटाच्या काळात शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, असे आवाहन वळसे पाटील यांनी केले.संबंधित विभागाने या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन लवकरात लवकर आवर्तन सुरू करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

मंचर : उत्तर पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागांत पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.तसेच चारा आणि पिके करपण्याच्या मार्गावर आहे.या पार्श्वभूमीवर कुकडी, डिंभे आणि चासकमान या प्रकल्पांतून तातडीने पाण्याचे आवर्तन सोडण्याची मागणी माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केली आहे.
यासंदर्भात माजी विधानसभेचे अध्यक्ष तथा माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांना पत्र दिले आहे. महाराष्ट्रात जुलै २०२६ नंतर पावसाने ओढ दिल्याने पुणे व अहिल्यानगर जिल्ह्यांसह राज्यातील अनेक भागांत पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. पावसाअभावी शेतातील उभी पिके करपण्याच्या मार्गावर असून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.
पावसाने दडी मारल्याने शेतकरी अडचणीत सापडले असून पिकांचे नुकसान टाळण्यासाठी जलसंपदा विभागाने विलंब न करता पाणी सोडण्याचा निर्णय घ्यावा, अशी आग्रही मागणी त्यांनी केली. शेतीसाठी पाणी उपलब्ध होण्याबरोबरच ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही मार्गी लागणे आवश्यक आहे. संकटाच्या काळात शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, असे आवाहन वळसे पाटील यांनी केले.संबंधित विभागाने या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन लवकरात लवकर आवर्तन सुरू करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.





