Pune District : भीमाशंकरचे १० लाख मे टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट – दिलीप वळसे पाटील
Pune District : आंबेगाव तालुक्यातील पारगाव येथील भीमाशंकर कारखान्याचा २७ व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रजोलन व गव्हाण पूजन समारंभ राज्याचे माजी गृहमंत्री व कारखान्याचे संस्थापक दिलीप वळसे पाटील व वारकरी सांप्रदायातील संत, महंत, ह.भ.प. किर्तनकार महाराज यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाला.

पारगाव शिंगवे : राज्यात यावर्षी भीषण दुष्काळाची परिस्थिती असून तापमानात वाढ होत असून पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होत आहे यामुळे साखर कारखान्यासमोर अडचणी निर्माण झालेला आहे. अनेक साखर कारखान्यांचा १०० दिवसांच्या आतच गळीत हंगाम संपण्याची शक्यता असून मराठवाड्यात दुष्काळी परिस्थिती असून येथे साखर कारखाने सुरू होतील का नाही अशी शंका निर्माण झालेली आहे. यामुळे भीमाशंकर कारखान्याने योग्य नियोजन करून १० लाख मेट्रीक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवलेले आहे.असे प्रतिपादन राज्याचे माजी सहकार मंत्री व भीमाशंकर कारखान्याचे संस्थापक दिलीप वळसे पाटील यांनी केले.
आंबेगाव तालुक्यातील पारगाव येथील भीमाशंकर कारखान्याचा २७ व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रजोलन व गव्हाण पूजन समारंभ राज्याचे माजी गृहमंत्री व कारखान्याचे संस्थापक दिलीप वळसे पाटील व वारकरी सांप्रदायातील संत, महंत, ह.भ.प. किर्तनकार महाराज यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाला. यावेळी झालेल्या कार्यक्रमात दिलीप वळसे पाटील बोलत होते.
या कार्यक्रमाला माजी आमदार पोपट गावडे, काकासाहेब पलांडे, भीमाशंकर साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील, जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील, बाजार समितीचे सभापती निलेश थोरात, भैरवनाथ पतसंस्थेचे उपाध्यक्ष सागर काजळे, प्रकाश पवार, राजेंद्र गावडे, कारखान्याचे संचालक बाळासाहेब घुले, दादाभाऊ पोखरकर, सरपंच प्रतिक्षा जाधव, पुष्पालता जाधव, नितीन वाव्हळ, रामहारी पोंदे, कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे, सचिव रामनाथ हिंगे, शिवाजीराव ढोबळे, दौलतराव लोंखडे, सरपंच राजेंद्र दाभाडे, वैभव उंडे, हभप खंडेश्वर महाराज, नवनाथ महाराज माशेरे, आदित्य महाराज जुन्नरकर आदी मान्यवर व सभासद,ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे-पाटील यांनी मानले. निलेश पडवळ यांनी सूत्रसंचालन केले.
दिलीप वळसे पाटील म्हणाले की, देशात साखरेचा साठा कमी झाल्याने सरकारने लवकरच, १५ ऑक्टोबरपर्यंत कारखाने सुरू करण्यास सांगितले आहेत. यामुळे ऊस लवकरच तोडावे लागणार आहेत. याचा तोटा शेतकऱ्यांना तसेच साखर कारखान्यांना पण होणार आहे तसेच दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे चाऱ्यासाठी ऊस गेल्यावर कारखान्याचे गणित पण बिघडू शकते. शेतकऱ्यांनी ऊस लागवडीच्या पारंपरिक पद्धतीत आवश्यक ते बदल करणे गरजेचे आहे. ऊस उत्पादन वाढवण्यासाठी आधुनिक शेती तंत्रज्ञानाबरोबरच कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित तंत्रज्ञानाचा वापर करण्याची आवश्यकता आहे. राज्यातील सर्व सहकारी कारखान्यांना 350 रुपये टनामागे उपलब्ध करून दिलेले आहे हे कर्ज ७ वर्षासाठी असून या कर्जाची कर्जाचे सर्व व्याज सरकार भरणार आहे. भीमाशंकर कारखान्याला बाहेरून ऊस आणावा लागणार आहे.तसेच कामगारांना २० टक्के बोनस देण्यात येणार आहे.
कारखान्याच्या आगामी गळीत हंगामात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत गाळपासाठी येणाऱ्या उसाला प्रथम हप्ता एफआरपी दर दिला जाईल. त्यानंतर जानेवारी महिन्यात एफआरपीपेक्षा प्रतिटन १०० रुपये, फेब्रुवारी महिन्यात २०० रुपये, तर मार्च महिन्यात एफआरपीपेक्षा प्रतिटन ३०० रुपये अतिरिक्त दर दिला जाणार असल्याचे सांगण्यात आले.
कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे म्हणाले की, भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचा कारभार पारदर्शक आणि नियोजनबद्ध पद्धतीने सुरू असल्यामुळे कारखान्याला देशपातळीवरील उत्कृष्ट पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. कारखान्याला साखर उत्पादनासह वीज प्रकल्पातूनही चांगले उत्पन्न मिळत असल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपीपेक्षा अधिक दर देणे शक्य झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या उसाला चांगला बाजारभाव देणे शक्य झाले. जिल्ह्यातील अनेक कारखान्यांच्या तुलनेत भीमाशंकर कारखान्याने प्रतिटन ३,५०० रुपये दर देऊन ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे.





