Pune: मेट्रोच्या तीन स्थानकांची नावे बदलणार

पुणे – शहरातील मेट्रो मार्गांच्या तीन स्थानकांची नावे बदलण्यात येणार आहेत. याबाबतचा प्रस्ताव महामेट्रोकडून केंद्रशासनास पाठविण्यात आला असून पुढील काही दिवसांत त्याला मान्यता मिळण्याची शक्यता आहे. या स्थानकांमध्ये बुधवार पेठ, मंगळवार पेठ तसेच नाशिक फाटा स्थानकाच्या नावांचा समावेश आहे.
मेट्रोचा प्रकल्प आराखडा तयार करताना स्थानकांना ही नावे देण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्षात ही स्थानके नाव दिलेल्या जागेपासून दूर असल्याने त्यांची नावे बदलण्याची मागणी केली जात होती. त्यानुसार, ही नावे बदलण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.
शहरात स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड आणि वनाज ते रामवाडी असे प्रत्येकी १६ कि.मी.दोन मार्ग असून या मार्गावर ३३ स्थानके आहेत. या स्थानकांच्या लगतच्या परिसराची नावे देण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्षात अनेक स्थानकांचा आणि नावाचा संबध नसल्याने प्रवाशांकडून ही नावे बदलण्याची मागणी करण्यात येत होती.
मेट्रोचे इंटरचेंज स्टेशन असलेल्या स्थानकालाही दिवाणी न्यायालय असे नाव देण्यात आले होते. मात्र, या ठिकाणी जिल्हा न्यायालय असल्याने हे नाव जिल्हा न्यायालय करावे, अशी मागणी प्रवाशांसह वकिलांकडूनही करण्यात आली होती.
अशी असतील नवी नावे…
मेट्रो मार्गांच्या तीन स्थानकांची नावे बदलताना बुधवार पेठ स्थानकाचे नाव कसबा पेठ स्थानक, मंगळवार पेठ स्थानकाचे नाव आरटीओ स्थानक आणि नाशिक फाटा स्थानकाचे नाव कासारवाडी असे करण्यात येणार असून त्याबाबतचे प्रस्ताव महामेट्रोकडून केंद्राकडे पाठविण्यात आले आहेत.





