Ravindra Chavan: “अजित पवारांचा हा केवळ निवडणूक स्टंट!”; भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचा पलटवार

प्रभात वृत्तसेवा
पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपवर केलेले भ्रष्टाचाराचे आरोप हा केवळ निवडणूक स्टंट आहे. भाजपने ठोस उत्तर दिल्यास अजित पवारांची राजकीय कोंडी होईल अशा शब्दात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पवार यांच्यावर टीका केली आहे. सत्तेत सहभागी असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर टीका करणे हा दुटप्पीपणा असल्याचा आरोपही त्यांनी केला.
गेल्या काही दिवसांपासून पुण्यात राष्ट्रवादी काॅग्रेसकडून गुन्हेगारांच्या कुटूंबातील सदस्यांना उमेदवारी देण्यावरून भाजप नेत्यांनी अजित पवारांवर टीका केली आहे. त्यावर शुक्रवारी पिंपरी-चिंचवडमध्ये पवार यांनी भाजप नेत्यांचा खरपूस समाचार घेतला होता.शनिवारी भाजप उमेदवारांच्या प्रचाराचा प्रारंभ चव्हाण यांच्या हस्ते झाला. त्यानंतर ते बोलत होते.
यावेळी भाजपचे प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, माजी मंत्री दिलीप कांबळे उपस्थित होते. चव्हाण म्हणाले, अजित पवार यांना राजकारणाचा मोठा अनुभव आहे. त्यामुळे आरोप करायचे असतील, तर माध्यमांतून करण्याऐवजी तपास यंत्रणांकडे रितसर तक्रार करावी. मोदी-फडणवीस यांचे नेतृत्व अयोग्य वाटत असेल, तर ते जाहीरपणे सांगण्याचे धाडस दाखवावे. भाजपने उत्तर दिल्यास पवार अडचणीत सापडतील, असा दावाही त्यांनी केला.
पुणे पालिकेच्या निवडणुकीबाबत चव्हाण म्हणाले, ही निवडणूक केवळ सत्तेसाठी नसून विकसित पुण्यासाठी आहे. नागरिकांना दर्जेदार सुविधा कोण देऊ शकते, याचा फैसला जनता करणार आहे. केंद्र- राज्यात भाजपचे सरकार असल्याने पुण्याच्या विकासासाठी ठोस पावले उचलली गेली. महाविकास आघाडीच्या काळात पुणे मेट्रोसाठी ठराव असूनही प्रत्यक्ष काम सुरू झाले नाही, कारण इच्छाशक्तीच नव्हती, असा आरोप त्यांनी केला.




