प्रभात वृत्तसेवा पुणे – महामेट्रोची स्थानके, स्थानकांची प्रवेशद्वारे, तसेच पार्किंगसाठी महापालिकेकडून महामेट्रोला ३० वर्षांच्या भाडेकराराने २० जागा देण्यात आल्या आहेत. त्यानुसार या जागांचे भाडे महापालिकेच्या हिश्श्यातून वळते करण्यात आले आहे. मात्र, आता या जागा महामेट्रोला बिनशर्त कायमस्वरूपी मालकीने दिल्या जाणार आहेत. धक्कादायक बाब म्हणजे नगरविकास विभागाने याबाबतचे आदेश काढले असून, महापालिका प्रशासनाला कोणतीही कल्पना नसल्याचे व महापालिकेस कोणताही अभिप्राय अथवा मत विचारले नसल्याचेही समोर आले आहे. या सर्व जागा तब्बल १ लाख ४३ हजार ९१६ चौरस मीटर असून, जागांचे मूल्य ५९५ कोटी रुपये आहे. मेट्रो प्रकल्पासाठी कर्ज काढण्यात आले असून ,त्याची प्रतिपूर्ती महामेट्रो करणार आहे. त्यासाठी या जागांचा व्यावसायिक वापर केला जाणार आहे. या जागा कायमस्वरूपी मिळाव्यात, यासाठी महामेट्रोने २०२३ मध्ये राज्य शासनाकडे मागणी केली होती. त्यात नागपूर, पुणे आणि पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील जागांचा समावेश होता. यात पुणे महापालिकेच्या हद्दीतील २० जागा आहेत. महापालिकेचे प्रकल्प अडचणीत.. महामेट्रोला देण्यात आलेल्या जागांमध्ये महापालिकेच्या दोन उद्यानांच्या दहा जागा आहेत. याशिवाय पालिकेच्या मुख्य इमारतीजवळील एलबीटी कार्यालय आणि शेजारील पार्किंगच्या एका जागेचाही समावेश आहे. या दोन्ही जागा सुमारे सव्वा एकरच्या आसपास असल्याने महापालिकेकडून या ठिकाणी बहुमजली वाहनतळ नियोजित आहे. याशिवाय कल्याणीनगर येथे असलेल्या जागेत महापालिकेकडून सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प उभारण्याचे नियोजन आहे. त्यामुळे या निर्णयाने महापालिकेचे प्रकल्पही अडचणीत आले आहेत. या २० जागांचा समावेश (कंसात क्षेत्रफळ चौरस मीटरमध्ये).. बोपोडी जकात नाका (२४००), स्वारगेट, पर्वती टीपी स्कीम (२८०००), वनाज-कोथरूड (१,०८,३००), आनंदनगर-कोथरूड (३०.२५), गरवारे महाविद्यालय-एरंडवना (६१८.२७), छत्रपती संभाजी उद्यान-७ जागा (१८६२), एलबीटी ऑफिस-शिवाजीनगर (७०), शिवाजीनगर-महापालिका भवन शेजारी (१३९), रमाबाई आंबेडकर उद्यान-बंडगार्डन (१४१), बंडगार्डन उद्यान-३ जागा (७२४), कल्याणी नगर येरवडा टीपी स्कीम (३९८), मंडई-सदाशिवपेठ (१२३५).