पुणे-नगर रस्त्यावरील चौकांना फ्लेक्सचा विळखा

येरवडा – पुणे-नगर रस्त्यावरील अनेक चौकांना फ्लेक्सचा विळखा बसला आहे. महापालिकेने चौकात लावलेले नामफलक, दिशादर्शक फलक या फ्लेक्सने झाकल्याने ते तत्काळ काढुन ज्यांनी हे अनधिकृत फ्लेक्स लावून या परिसराचे विद्रुपीकरण केले आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल करावी, अशी मागणी मातोश्री सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष दत्तात्रय सोंडेकर यांनी केली आहे.
नगर रस्त्यावर वडगावशेरीकडे जाणाऱ्या चौकाचे पालिकेकडून शिवपुत्र धर्मवीर संभाजी महाराज चौक, असे नामकरण करण्यात आले आहे. याच चौकात अनेक राजकीय व व्यावसायिकांनी त्यांचे फ्लेक्स लावून पालिकेचा फलक झाकला आहे. यामुळे नागरिकांमध्ये नाराजी असून महापुरुषांच्या फलकासमोर फ्लेक्सबाजी केल्याने एक प्रकारे महापुरुषांचा अवमान होत आहे. याविषयी नागरिक संताप व्यक्त करीत असुन पालिकेच्या आकाश चिन्ह व अतिक्रमण विभागाला वारंवार कळवुनही ते कोणतीच दखल घेत नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
नगररोड वरील शिवपुत्र धर्मवीर संभाजी महाराज या चौकामधील योग्य त्या ठिकाणी फलकाचे सुशोभीकरण करून तो फलक दर्शनी भागात लावावा, फलका समोर नो-फ्लेक्स झोन करावा तसेच या फलका समोर फ्लेक्स लावणाऱ्यावंर विद्रुपीकरणाबाबत गुन्हा दाखल करावा, अशी मागणी नगर रोड क्षेत्रीय कार्यालयाकडे करण्यात आली आहे.





