Pune : महापालिका निवडणुका लांबणीवर

पुणे : राज्यातील रखडलेल्या महापालिका आणि नगरपरिषदांच्या निवडणुकीच्या प्रभाग रचनेच्या कामात आता नगरविकास विभागाचाही समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे शासनाकडून यापूर्वी जाहीर करण्यात आलेल्या प्रभाग रचनेच्या वेळापत्रकात मोठा बदल झाला असून, आता निवडणुकांची अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्याची सुधारीत तारीख ६ ऑक्टोबर असणार आहे.
यापूर्वी ही मुदत ४ सप्टेंबर होती. परिणामी निवडणुकांच्या वेळापत्रकावर त्याचा परिणाम होणार असून, आता नोव्हेंबर- डिसेंबरमध्ये निवडणुका होण्याची शक्यता आहे. नवीन वेळापत्रकानुसार प्रारूप प्रभाग रचना नगरविकास विभागाकडे चार दिवस, तर अंतिम प्रभाग रचना सहा दिवस असणार आहे.
रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका चार आठवड्यांत जाहीर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाकडून राज्याच्या नगरविकास विभागास सूचना केल्या होत्या. त्यानुसार, नगरविकास विभागाने १० जून रोजी प्रारूप प्रभाग रचना तयार करण्याचे आदेश दिले होते, तर १२ जून रोजी वेळापत्रक जाहीर केले होते.
त्यानंतर सोमवारी शासनाकडून प्रभाग रचनेच्या कार्यपद्धतीत नगरविकास विभागाचा समावेश करणारे शुद्धिपत्रक काढले. त्यामुळे या प्रक्रियेत नगरविकास विभागाचाही समावेश करण्यात आल्याने शासनाकडून लागोलाग सुधारीत वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे.
असे आहे सुधारीत वेळापत्रक
११ ते १६ जून : प्रगणकगट मांडणी व प्रारूप प्रभाग तयार करणे
१७ ते १८ जून : जणगणनेची माहिती तपासणे
१९ जून ते ४ जुलै : स्थळ पाहणी करणे
५ ते १० जुलै : गुगलमॅपवर नकाशे तयार करणे
११ ते २४ जुलै : प्रत्यक्ष जागेवर जाऊन हद्द तपासणे
२५ ते ३१ जुलै : प्रभाग रचनेच्या मसुद्यावर सह्या घेणे
१ ऑगस्ट ते ५ ऑगस्ट : प्रारूप प्रभाग रचना नगरविकास विभागास पाठविणे
६ ते ११ ऑगस्ट : प्रारूप प्रभाग रचना प्रस्ताव नगरविकासने निवडणूक आयोगास सादर करणे
२२ ते २८ ऑगस्ट : प्रभाग रचना प्रसिद्ध करणे व हरकती मागवणे
२९ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर : प्रभाग रचनेवर हरकती व सुनावणी
९ ते १५ सप्टेंबर : सुनावणीनंतर बदल केलेली रचना नगरविकास विभागास सादर करणे
१६ ते २२ सप्टेंबर : अंतिम केलेली प्रभाग रचना नगरविकासने आयोगास सादर करणे
३ ऑक्टोबर ते ६ आॉक्टोबर : अंतिम प्रभाग रचना जाहीर करणे





