पुणे : महापालिकेच्या “लाइट हाऊस” प्रकल्पाद्वारे 5,550 जणांना रोजगार

पुणे – शहरातील अल्प उत्पन्न गटातील तरुण-तरुणी व सुशिक्षित बेरोजगारांना कौशल्य विकास प्रशिक्षण देणाऱ्या “लाइट हाऊस’ प्रकल्पातून आतापर्यंत 9,000 हून अधिक जणांनी प्रशिक्षण प्राप्त केले असून, तब्बल 5,550 जणांना रोजगार मिळाला आहे. या प्रकल्पातील प्रशिक्षणानंतर रोजगार मिळालेल्यांपैकी तब्बल 73 टक्के जणांनी यापूर्वी कधीही काम केले नव्हते.
संपूर्ण शहरात एकूण 15 लाइट हाऊस प्रकल्प सुरू करण्याचे नियोजन असून, आतापर्यंत 11 प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत. नोंदणी करण्यासाठी शिक्षणाची कोणतीही अट नसल्यामुळे या प्रकल्पांमध्ये आतापर्यंत एकूण 13,000 हून अधिक जणांनी प्रशिक्षणासाठी अर्ज केले आहेत. झोपडवस्त्यांमध्ये राहणाऱ्या मेहनती आणि गरजू तरुण-तरुणींसाठी “लाइट हाऊस’ प्रकल्प लाभदायक ठरत आहे.
महापालिकेच्या क्षेत्रातील अल्प उत्पन्न गट आणि झोपडवस्त्यांमधील युवकांचे सक्षमीकरण करण्यासाठी “पुणे सिटी कनेक्ट’ (पीसीसी) या संस्थेने पुणे महापालिकेशी “लाइट हाऊस’ प्रकल्पासाठी सामंजस्य करार केला असून, “स्मार्ट सिटीज मिशन’अंतर्गत “लाइट हाऊस’ची अंमलबजावणी केली जाते. रोजगारासाठी पूरक असलेल्या कौशल्य विकासासोबतच नेतृत्वगुणांच्या विकासावरही “लाइट हाऊस’मध्ये भर दिला जातो. “पीसीसी”च्या आकडेवारीनुसार, “लाइट हाऊस’मधील तब्बल 76 टक्के नोंदणी येथून प्रशिक्षित झालेल्या तरुण-तरुणींच्या परिचयातूनच होते. उल्लेखनीय बाब म्हणजे, या प्रकल्पातून प्रशिक्षित झालेल्यांपैकी 900 हून अधिक जणांनी उच्च शिक्षणासाठीही नोंदणी केली आहे.
2017 मधील जुलैपासून “लाइट हाऊस’च्या अंमलबजावणीस वेग आला. सध्या कार्यान्वित असलेल्या अकरापैकी नऊ प्रकल्प गेल्या साडेचार वर्षांत पूर्ण झाले असून 9,000 हून अधिक जण प्रशिक्षित होऊन बाहेर पडले आहेत. “लाइट हाऊस’चा लाभ झोपडवस्तीमधील तरुणांपर्यंत पोहोचावा, यासाठी प्रत्यक्ष घरांना भेटी देणे, स्थानिक लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन जनजागृती करणे आणि “लाइट हाऊस’च्या आजी-माजी विद्यार्थ्यांच्या साहाय्याने इतरांपर्यंत माहिती पोहोचविणे अशी कार्यपद्धती वापरली जाते. एका झोपडवस्तीमध्ये किमान 20 टक्के घरांमधून प्रकल्पासाठी नोंदणी करण्याचे उद्दिष्ट ठेवले जाते. व्यावसायिक कौशल्य विकासासोबतच इंग्रजी लिहिणे-बोलणे व डिजिटल माध्यमे हाताळण्याचा सराव करून घेतला जातो. यामुळे प्रशिक्षणार्थींचा आत्मविश्वास कमालीचा उंचावत असल्याचे निरीक्षण महापालिकेने नोंदविले आहे. येथे डेटा एन्ट्री, डीटीपी, फॅशन डिझायनिंग, टॅली, ब्युटी पार्लर, वाहन दुरुस्ती, इलेक्ट्रिशियन, नर्सिंग असिस्टंट अशा कायम मागणी असलेल्या क्षेत्रातील प्रशिक्षण दिले जाते.
“लाइट हाऊस’मधून प्रशिक्षण घेतलेल्यांना नोकरी देण्यासाठी 3,000 हून अधिक कंपन्यांशी “पीसीसी’ने करार केले आहेत. “लाइट हाऊस’ प्रकल्पाला “कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी’अंतर्गत (सीएसआर) आतापर्यंत 50 हून अधिक कंपन्यांनी 5.55 कोटी रुपयांची मदत केली आहे.
शहरातील पायाभूत सुविधा विकसित करताना कुशल मनुष्यबळ तयार करणेही तितकेच महत्त्वाचे असते. शहराच्या व्यवस्थेत आपल्यालाही संधी आहेत, ही भावना समाजाच्या सर्व स्तरांतील तरुण-तरुणींमध्ये रुजविण्याच्या दृष्टीने “लाइट हाऊस’ प्रकल्प मोलाची भूमिका बजावत आहेत.
– मुरलीधर मोहोळ, महापौर





