पुणे पालिकेला मिळणार तिसरे अतिरिक्त आयुक्त

डॉ. विपीन शर्मा पुन्हा रुजू होणार
पुणे – करोनाच्या संकटात शहराच्या प्रशासकीय कामकाजावर ताण येत असतानाच आता महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. विपीन शर्मा पुन्हा सेवेत रुजू होणार आहेत. डॉ. शर्मा हे मागील आठवड्यातच लंडनहून पुण्यात परतले आहेत. सध्या ते एका हॉटेलमध्ये विलगीकरणात आहे. सात दिवसांचा कालावधी संपताच ते पुढील आठवड्यात रुजू होणार आहेत, असे आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले.
शर्मा यांची 2019 मध्ये महापालिकेत नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर काही महिन्यांतच त्यांना सप्टेंबर 2019 मध्ये प्रशासकीय सेवेतील प्रशिक्षणाच्या निमित्ताने 1 वर्षासाठी केंद्रशासनाने लंडनमध्ये पाठवले होते. मात्र, तेथेही करोनाची साथ असल्याने प्रशिक्षणास गेलेले अधिकारी पुन्हा परत आले आहेत.
त्यात डॉ. शर्मा यांचाही समावेश आहे. पाच दिवसांपूर्वी ते पुण्यात आले असून त्यांना नियमानुसार संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. दोन दिवसांत त्यांची करोना चाचणी होईल. त्यानंतर ते पदभार स्वीकारणार असल्याचे आयुक्त गायकवाड म्हणाले. दरम्यान, डॉ. शर्मा परत आल्याने प्रशासकीय कामकाजात आणखी सुसूत्रता येणार आहे. पालिकेत अतिरिक्त आयुक्तांची 3 पदे असून इतके दिवस एक पद रिक्त होते.




