पुणे : महापालिका घेणार ‘एसआरपीएफ’ची मदत?

पुणे –शहरातील अतिक्रमण कारवाई आणखी वेगाने करण्यासाठी महापालिका प्रशासन आता राज्य राखीव पोलीस बल (एसआरपीएफ)ची मदत घेणार आहे. शहरात प्रशासकीय कारभार सुरू झाल्यानंतर अतिक्रमण, आकाशचिन्ह आणि बांधकाम निर्मूलन विभागाकडून संयुक्त कारवाई सुरू असली तरी त्यासाठी आवश्यक असलेला बंदोबस्त मिळत नसल्याने कारवाईच्या वेळी वाद होत आहेत. त्यामुळे, पोलिसांसह आता महापालिका “एसआरपीएफ’ची मदत घेणार असून त्याबाबतचे पत्र महापालिका आयुक्तांच्या मान्यतेने पाठविण्यात येणार असल्याचे प्रशासने स्पष्ट केले. त्यासाठी “एसआरपीएफ’च्या 100 पोलिसांची मदत घेतली जाणार असल्याचे सुत्रांनी स्पष्ट केले. आतापर्यंत महापालिकेने जवळपास दीड लाख चौरस फूटांचे अतिक्रमण काढले असून त्यात बहुतांश पक्क्या बांधकामांचा समावेश आहे.
कारवाईचा वेग वाढविणार
महापालिकेच्या तीन विभागांकडून ही संयुक्त कारवाई केली जात आहे. त्यासाठी 15 क्षेत्रीय कार्यालयांना आठवड्यातील प्रत्येकी दोन दिवस निश्चित करून दिले आहेत. त्यानुसार शहरात ही कारवाई सुरू आहे. मात्र, कारवाईस विरोध होत असल्याने तासन्तास कारवाई थांबवून ठेवावी लागत आहे. तर, अनेकदा शहरात मंत्र्यांचे दौरे असल्यास महापालिकेस आवश्यक असलेला पोलीस बंदोबस्त मिळत नाही. त्यामुळे, पोलिसांसोबतच “एसआरपीएफ’चा बंदोबस्त मिळाल्यास महापालिकेस नियोजनानुसार, तसेच प्रभावी कारवाई करता येणार आहे.
आता आयत्यावेळी कारवाई
महापालिकेकडून प्रशासक नियुक्तीनंतर शहरभर ही कारवाई करण्याचे नियोजन केले होते. मात्र, पालिकेने नागरिकांना कारवाईचे आवाहन करताना कोणत्या क्षेत्रीय कार्यालयाने कोणत्या दिवशी कारवाई करायची हे जाहीर केले. त्याचा उलट परिणाम झाला असून आपल्या हद्दीत कारवाईसाठी जे दिवस निश्चित केले आहेत. त्याच दिवशी रस्त्यावरील अतिक्रमणे गायब होत असून संबंधित भागातील व्यावसायिकही व्यावसाय बंद ठेवत आहेत. त्यामुळे, प्रशासनास अपेक्षित कारवाई करता येत नाही. त्यामुळे यापुढे आयत्यावेळी कारवाईचा दिवस निश्चित करून तशा सूचना क्षेत्रीय कार्यालयांना दिल्या जाणार आहेत.





