pune : महापालिकेच्या शाळा खासगी संस्थांच्या ताब्यात
pune :

विरोध डावलून भाजपकडून प्रस्तावास मान्यता
पुणे – महापालिकेच्या पाच शाळांतील साडेचार हजार विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देणार्या आकांक्षा फाउंडेशन या संस्थेला पुढील तीन वर्षे शिक्षक व अन्य स्टाफच्या वेतनासाठी प्रत्येक विद्यार्थ्यामागे २५ हजार रुपये निधी देण्याच्या प्रस्तावास सत्ताधारी भाजपने बहुमताच्या जोरावर मान्यता दिली. या प्रस्तावास राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने विरोध केला. मात्र, मतदानाच्या जोरावर ४ विरोधात ११ मतांनी हा प्रस्ताव मंजूर केला आहे.
आकांक्षा फाउंडेशनने २००७ पासून टप्प्याटप्प्याने या शाळांची जबाबदारी स्वीकारली आहे. महापालिकेच्या के. सी. ठाकरे विद्या निकेतन (सोमवार पेठ), सावित्रीबाई फुले शाळा (भवानी पेठ), कै. अनंतराव पवार शाळा (बोपोडी), मातोश्री शाळा (येरवडा) आणि पूज्य कस्तुरबा गांधी शाळा (कोरेगाव पार्क) या पाच इंग्रजी माध्यम शाळा सध्या आकांक्षा फाउंडेशनमार्फत चालविल्या जातात.
या शाळांमधील सर्वच बाबींचे ऑडिट करून महपाालिकेच्या इतर शाळांतही याच पद्धतीने दर्जेदार शिक्षण देण्याबाबत अभ्यास करण्यासाठी महापौरांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण क्षेत्रातील समिती नेमण्यात येणार आहे, असेही भिमाले यांनी सांगितले.
शाळांच्या या खासगीकरणाला काँग्रेस पक्षाकडून तीव्र विरोध केल्याचे समिती सदस्य प्रशांत जगताप यांनी सांगितले. स्थायी समितीचे पुनर्गठन झाल्यानंतर गेल्या ५ महिन्यांत पहिल्यांदाच एखाद्या प्रस्तावावर मतदान घेण्याची वेळ आली.
महापालिकेच्या शाळा चालवण्यासाठी आकांक्षा फाउंडेशनला १०८ कोटी रुपये देण्याचा प्रशासनाचा, सत्ताधाऱ्यांचा डाव असून, या उधळपट्टीला काँग्रेसचा विरोध आहे, अशी भूमिका स्थायी समितीचे सदस्य प्रशांत जगताप यांनी मांडली.
जगताप यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे सुहास टिंगरे, अमोल बालवडकर, वैशाली बनकर यांनीही विरोध केला आहे. सर्वांना मोफत शिक्षणाचा हक्क मिळावा, अशी आपली भूमिका आहे, मात्र, यासाठी पुणे महापालिकेच्या शाळा खासगी संस्थांच्या घशात घालण्यास आमचा विरोध आहे, अशी भूमिका या सर्व नगरसेवकांनी मांडली.





