Pune : गणेशोत्सवासाठी महापालिका सज्ज; मूर्तीदान, निर्माल्य संकलनावर भर

पुणे – शहराचा ऐतिहासिक वारसा आणि वैभवशाली गणेशोत्सव पुणेकरांच्या माध्यमातून यंदाही पर्यावरणपूरक साजरा व्हावा या उद्देशाने महापालिका प्रशासन सरसावले आहे. महापालिकेकडून शहरात गणेशोत्सवाच्या कालावधीत मूर्तीदान संकल्पनेवर भर देण्यात येणार असून, यंदाही निर्माल्य संकलनातून खतनिर्मिती केली जाणार आहे.
याशिवाय, न्यायालयाने ५ फुटांपेक्षा कमी आकाराच्या गणेशमूर्तींचे विसर्जन कृत्रिम हौदात करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यासाठी महापालिकेकडून यंदा या विसर्जनासाठी लोखंडी टाक्यांची संख्याही वाढविण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त संदीप कदम यांनी दिली.
२४१ ठिकाणी मूर्तीसंकलन केंद्र
गेल्या काही वर्षांत महापालिकेकडून पुणेकरांना पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले जात आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत असून, गणेशोत्सवाच्या कालावधीत मूर्तीदानाचे प्रमाण वाढले आहे. मागील वर्षी (२०२४-२५) शहरात १ लाख ७६ हजार ६७ मूर्तीदान करून या मूर्ती महापालिकेकडे देण्यात आल्या होत्या. हे वाढलेले प्रमाण पाहता महापालिकेकडून यंदा २४१ ठिकाणी मूर्तीदान केंद्र उभारण्यात येणार आहे.
तर गणेशमूर्ती विसर्जनासाठी संपूर्ण शहरात १५ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत ३८ ठिकाणी नदीकाठच्या परिसरात बांधलेले विसर्जन हौद, २८१ ठिकाणी ६४८ लोखंडी टाक्या मूर्ती विसर्जनासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच, नदीकाठचे विसर्जन हौद आणि लोखंडी टाक्या असलेल्या ठिकाणी ३२८ निर्माल्य संकलन कंटेनर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मागील वर्षी शहरात महापालिकेकडून ७०६ टन निर्माल्य संकलन करून त्यापासून पाषाण तलावाच्या परिसरात सेंद्रिय खत तयार करण्यात आले होते.
शाडूमातीचेही संकलन करणार
महापालिकेकडून मागील काही वर्षांपासून स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून पुनर्वापर प्रकल्प राबविण्यात येत आहे. शाडूमाती ही मर्यादित संसाधन असल्याने तिच्या उत्खननामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतो. ही बाब लक्षात घेऊन या मातीचा पुनर्वापर केला जाणार आहे. त्यासाठी ४६ ठिकाणी शाडूमाती संकलन केंद्रेही महापालिकेकडून यंदा उभारण्यात येणार आहे. या ठिकाणी संकलित झालेल्या मूर्ती तसेच माती मूर्तीकारांना परत देण्यात येणार आहे. त्यासाठी विसर्जन घाटांवर स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून जनजागृती केली जाणार आहे.
असे आहे पालिकेचे नियोजन
नदीकाठचे बांधकाम केलेले विसर्जन हौद – ३८
विसर्जनासाठी २८१ ठिकाणी सुविधा
विसर्जनासाठी ६४८ लोखंडी टाक्या
मूर्ती संकलन केंद्रे – २४१
निर्माल्य कलश – ३२८
शाडूमाती संकलन केंद्रे – ४६





