pune: पुणे- मुंबई विद्यापीठाचा ‘एम.टेक’ अभ्यासक्रम
Pune:

ऊर्जा आणि नॅनो तंत्रज्ञानाचा मेळ; संयुक्त पदवी घेण्याची संधी
pune: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि मुंबई विद्यापीठ यांनी एकत्र येत एका ऐतिहासिक संयुक्त पदव्युत्तर पदवी (एम.टेक) अभ्यासक्रमाची घोषणा केली आहे.
पुणे विद्यापीठाच्या इतिहासातील हा पहिलाच संयुक्त पदवी अभ्यासक्रम ठरला असून, शैक्षणिक व संशोधनात्मक समन्वयाचे हे एक उत्कृष्ट उदाहरण मानले जात आहे. हा अभ्यासक्रम पुणे विद्यापीठाचे सेंटर फॉर एनर्जी स्टडीज आणि मुंबई विद्यापीठाचे सेंटर फॉर नॅनो सायन्सेस ॲण्ड नॅनो तंत्रज्ञानच्या संयुक्त विद्यमाने राबविला जाणार आहे.
सध्या सौर ऊर्जा, हायड्रोजन फ्युएल सेल, इलेक्ट्रिक वाहने आणि प्रगत बॅटरी स्टोरेज या क्षेत्रांत मोठे संशोधन सुरू आहे. पारंपरिक ऊर्जा अभ्यासाला नॅनो तंत्रज्ञानाची जोड दिल्यास ऊर्जेची साठवणूक आणि कार्यक्षमता अनेकपट वाढवणे शक्य होते. याच पार्श्वभूमीवर हा अभ्यासक्रम नव्या संशोधनाला गती देईल.
उद्योगांची गरज आणि नॅनो सायन्सचे महत्त्व विचारात घेऊन हा संयुक्त अभ्यासक्रम डिझाइन केला आहे. पुणे विद्यापीठात मूलभूत विज्ञान, तर नॅनो तंत्रज्ञानाचे धडे मुंबई विद्यापीठाकडून दिले जातील.
– डॉ. सुरेश गोसावी, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
अभ्यासक्रमाची प्रमुख वैशिष्ट्ये:
केवळ २५ विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता
प्रवेश परीक्षेतून गुणवत्तेनुसार निवड
दोन्ही विद्यापीठ अत्याधुनिक प्रयोगशाळा,
जागतिक दर्जाची उपकरणे, तज्ज्ञांचे मार्गदर्शन
एनर्जी, नॅनो-मटेरियल्स, सेमीकंडक्टरमध्ये रोजगाराची संधी





