Pune Mumbai Railway: रेल्वे प्रवाशांचा खोळंबा! बोगद्यात रेल्वे रुळांवर दरड कोसळल्याने पुणे-मुंबई रेल्वे सेवा ठप्प
Pune Mumbai Railway: इंद्रायणी, प्रगती आणि इंटरसिटी एक्स्प्रेस दोन्ही बाजूंनी रद्द; लांब पल्ल्याच्या गाड्या कल्याण-इगतपुरी आणि मनमाड मार्गे वळवल्या.

Pune Mumbai Railway – मुंबई-पुणे रेल्वे मार्गावरील बोगदा क्रमांक ४० (ठाकुरवाडी ते मंकी हिलमधील) येथे रेल्वे रुळांवर दरड कोसळल्याने पुणे- मुंबई दरम्यानची रेल्वे वाहतूक बंद करण्यात आली आहे. दरड कोसळल्याने पुणे-मुंबई रेल्वे सेवा ठप्प झाली आहे. या रेल्वे मार्गावरील ८५ गाड्यांवर परिणाम झाला आहे. १७ गाड्या पूर्णपणे रद्द झाल्या असून ३१ रेल्वेचे मार्ग बदलले आहेत. अर्ध्यावर थांबवलेल्या गाड्या १८, पर्यायी स्थानकावरून सोडलेल्या १५ आणि चार गाड्यांच्या वेळेत बदल केला आहे.
ठाकुरवाडी आणि मंकी हिलमधील रेल्वे मार्गावर दरड कोसळल्याची माहिती मिळताच मध्य रेल्वेचे अधिकारी, तांत्रिक पथक आणि आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली आहे. मुसळधार पाऊस आणि धुक्याने परिसर वेढलेला असतानाही रुळांवरील मलबा, दगड हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पावसाचा जोर कायम असल्याने ढिगारा काढण्यात अडथळे येत आहेत.
मुंबईला जाणाऱ्या-येणाऱ्या रेल्वे बंद
मुंबई-पुणे दरम्यान धावणाऱ्या डेक्कन क्विन, सिंहगड एक्सप्रेस, इंद्रायणी एक्सप्रेस, प्रगती एक्सप्रेस, डेक्कन एक्सप्रेस आणि इंटरसिटी एक्सप्रेस आज दोन्ही बाजूंनी पूर्णपणे रद्द केल्या. सोलापूर इंटरसिटी, मुंबई-धुळे एक्सप्रेस आणि सिद्धेश्वर एक्सप्रेसही रद्द केल्या. लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये कल्याण-इगतपुरी-मनमाड-दौंड किंवा सुरत-जळगाव-मनमाड मार्गे वळविल्या. त्यामध्ये अहमदाबाद-पुणे दुरंतो, इंदूर-दौंड एक्सप्रेस, भुवनेश्वर-मुंबई कोणार्क एक्सप्रेस आणि हजरत निजामुद्दीन-पुणे एक्सप्रेस या रेल्वेचा समावेश आहे.
सोलापूर-मुंबई वंदे भारत एक्सप्रेस, महालक्ष्मी एक्सप्रेस आणि हुसेन सागर एक्सप्रेस पुणे, लोणावळा किंवा चिंचवड स्थानकावरच थांबवण्यात आल्या. विशाखापट्टणम एक्सप्रेस लोणावळ्यापर्यंत तर कोयना एक्सप्रेस खडकी स्थानकापर्यंतच चालवण्यात आली. दौंड-इंदूर एक्सप्रेस सहा तास उशिराने सुटली. तसेच कोयना एक्सप्रेस, मुंबई-नांदेड एक्सप्रेसच्या वेळेत बदल केला आहे. प्रवाशांनी प्रवासास निघण्यापूर्वी चौकशी करून बाहेर पडावे.





