Pune Miraj Railway Block : रेल्वे प्रवाशांनो लक्ष द्या! पुणे-मिरज मार्गावर २१ दिवसांचा रेल्वे ब्लॉक; वंदे भारतसह ‘या’ गाड्यांवर मोठा परिणाम
Pune Miraj Railway Block : णे-मिरज दुहेरीकरण प्रकल्पांतर्गत निरा यार्ड नूतनीकरणासाठी मध्य रेल्वेकडून ५ जून ते २५ जून २०२६ दरम्यान प्री-नॉन-इंटरलॉकिंग ब्लॉक घोषित.

Pune Miraj Railway Block – पुणे-मिरज दुहेरीकरण प्रकल्पाशी संबंधित निरा यार्डच्या नूतनीकरणानंतर ते कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधांचे अद्ययावतीकरण आणि सुरक्षिततेची कामे करण्यात येत आहे. त्यासाठी मध्य रेल्वेचा पुणे विभाग प्री-नॉन-इंटरलॉकिंग आणि नॉन-इंटरलॉकिंग ब्लॉक घेणार आहे. दि. ५ जून ते २५ जून २०२६ दरम्यान २१ दिवसांचा हा ब्लॉक असेल. त्यामुळे या काळात रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात मोठे बदल केले असून, अनेक गाड्या रद्द तर गाड्या वळवण्यात आल्या आहेत.
कोल्हापूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेससह कोल्हापूर-पुणे डेमू, बंगळुरू-गांधीधाम एक्स्प्रेस, बंगळुरू-एलटीटी मुंबई एक्स्प्रेस, अहमदाबाद-कोल्हापूर एक्स्प्रेस, मैसूर-अजमेर एक्स्प्रेस या गाड्या दि. ५ ते २५ जून दरम्यान वेगवेगळ्या तारखांना १५ मिनिटांपासून ते अडीच तासापर्यंत विविध स्टेशनवर थांबवून ठेवल्या जातील. त्यामुळे या गाड्या उशिराने धावतील. तर निजामुद्दीन-वास्को एक्स्प्रेस दि. २४ जून रोजी मनमाड-दौंड-कुर्डुवाडी-मिरज या बदललेल्या मार्गाने धावेल.
दि. २० जून रोजी कोल्हापूर-पुणे डेमू कोल्हापूरवरून दोन तास उशिराने म्हणजेच दुपारी १२ वाजून ५० मिनिटांनी सुटेल. मिरज-निजामुद्दीन एक्स्प्रेस दि. २१ जूनला मिरजवरून सव्वातास उशिराने सुटेल. तर कोल्हापूर-गोंदिया एक्स्प्रेस दि. २५ जूनला दोन तास उशिराने म्हणजेच दुपारी ४ वाजून ५० वाजता सुटेल. कोल्हापूर-पुणे डेमू दि. ९, १६, २२ आणि २३ जूनल साताऱ्यापर्यंतच धावेल. तर १९ आणि २५ जूनला लोणंद स्टेशनवर थांबेल.
बिकानेर-मिरज एक्स्प्रेस दि. १५ जून रोजी खडकी स्टेशनपर्यंतच धावेल. हुबळी-पुणे वंदे भारत एक्स्प्रेस दि. १९ जून रोजी साताऱ्यापर्यंतच धावेल, त्यामुळे सातारा-पुणेदरम्यान प्रवास रद्द होईल. दरम्यान, पुणे-फलटण-पुणे डेमू दि. १७ आणि २५ जून रोजी रद्द आहे. लोणंद-फलटण-लोणंद डेमू दि. १७, १९ आणि २५ जून, पुणे-सातारा डेमू दि. १९ आणि २५ जून तर सातारा-पुणे डेमू दि. १७ ते २१ आणि २४, २५ जून रोजी रद्द करण्यात आली आहे.
पुणे-कोल्हापूर डेमू दि. ९, १६ ते २४ जून दरम्यान पुणेऐवजी साताऱ्यातून सुटेल. तसेच १९ आणि २५ जून रोजी लोणंदवरून सुटेल. मिरज-बिकानेर एक्स्प्रेस दि. १६ जूनला मिरजऐवजी खडकी स्टेशनवरून सुटेल. तर पुणे-कोल्हापूर वंदे भारत एक्स्प्रेस दि. १९ जून रोजी पुणेऐवजी साताऱ्यातून सुटेल.





