Pune Mumbai Missing Link : पुणे-मुंबई प्रवास आता ‘सुसाट’! जगातील सर्वात रुंद बोगद्यातून धावणार तुमची गाडी; पाहा काय बदललं
Pune Mumbai Missing Link : वाहतूक कोंडीतून प्रवाशांची कायमची सुटका; पायाभूत सुविधांच्या विकासात महाराष्ट्राची जागतिक स्तरावर मोठी झेप.

Pune Mumbai Missing Link – पुणे-मुंबई द्रुतगती मार्गाला पूर्णतः ऍक्सेस कंट्रोल बनवणाऱ्या बहुप्रतिक्षित मिसिंग लिंक प्रकल्पाचा अखेर शुभारंभ झाला असून, घाटातील वाहतूक कोंडीने त्रस्त असलेल्या वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले.
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील खोपोली एक्झिट ते कुसगाव या दरम्यान साकारलेला हा मिसिंग लिंक प्रकल्प अभियांत्रिकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. तब्बल ६,९९५ कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेला हा प्रकल्प केवळ पायाभूत सुविधांमधील मोठी झेप नसून, प्रवाशांच्या दैनंदिन प्रवासातील अडथळे दूर करणारा निर्णायक टप्पा ठरणार असल्याचे सांगितले जात आहे.
लोणावळा-खंडाळा घाट परिसरात वारंवार होणारी वाहतूक कोंडी, अपघात आणि वेळेचा अपव्यय ही मोठी समस्या होती. विशेषतः सुट्ट्यांच्या काळात आणि पावसाळ्यात वाहनांची रांग किलोमीटरपर्यंत लागायची. मिसिंग लिंकमुळे ही परिस्थिती मोठ्या प्रमाणात बदलणार असून, घाटातील वाहतूक आता अधिक सुरळीत आणि सुरक्षित होणार आहे. या नव्या मार्गामुळे खोपोली ते कुसगाव दरम्यानचा प्रवास आता केवळ १५ ते २० मिनिटांत पूर्ण होणार आहे.
पूर्वी याच अंतरासाठी ४५ ते ६० मिनिटे लागत होती. म्हणजेच सुमारे ३० मिनिटांची थेट बचत होणार आहे. तसेच प्रवासाचे अंतरही सुमारे ५.७६ किलोमीटरने कमी झाले आहे. खंडाळा घाटातील तीव्र वळणे, चढ-उतार आणि धोकादायक भाग आता टाळता येणार असल्याने अपघातांचे प्रमाण घटण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. एक्सप्रेस वे आणि जुन्या महामार्गावरील वाहतूक वेगळी झाल्याने वाहतुकीचा ताण कमी होणार आहे.
वेगवान आणि सुरळीत दळणवळणामुळे मुंबई-पुणे या दोन महत्त्वाच्या शहरांमधील व्यावसायिक हालचालींना गती मिळणार आहे. लॉजिस्टिक्स, उद्योग आणि पर्यटन क्षेत्राला या प्रकल्पाचा मोठा फायदा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मिसिंग लिंक प्रकल्प हा केवळ रस्ता नाही, तर महाराष्ट्राच्या प्रगतीचे प्रतीक मानला जात आहे.
जागतिक स्तरावर नोंद घेण्याजोग्या या प्रकल्पामुळे राज्याच्या पायाभूत सुविधांमध्ये एक नवा अध्याय जोडला गेला आहे. एकूणच, वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या या प्रकल्पाच्या पूर्णत्वामुळे मुंबई-पुणे प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि आरामदायी होणार असल्याची अपेक्षा वाहनचालकांकडून व्यक्त केली जात आहे.
तांत्रिकदृष्ट्या अद्वितीय प्रकल्प
१०.५ किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पात दोन भव्य बोगदे, उंच व्हायाडक्ट आणि टायगर व्हॅलीवरील सुमारे १८२ मीटर उंच केबल-स्टेड पूल उभारण्यात आला आहे. सुमारे २३.७५ मीटर रुंद बोगदा हा जगातील सर्वात रुंद बोगद्यांपैकी एक मानला जातो. अत्यंत कठीण भौगोलिक परिस्थितीत, मुसळधार पाऊस आणि ताशी ७० किमी वेगाच्या वाऱ्यांमध्ये हा प्रकल्प पूर्ण करणे मोठे आव्हान होते. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने हे आव्हान यशस्वीरीत्या पेलले आहे.





