Nitin Gadkari : नितीन गडकरींना दिलासा ! इथेनॉल संदर्भात मुंबई हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय
गेल्या काही दिवसांपासून पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याच्या मुद्द्यावरून सोशल मीडियावर जोरदार वाद पेटला असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना यावरून मोठ्या प्रमाणावर ट्रोलिंगला सामोरे जावे लागत आहे.

Nitin Gadkari : गेल्या काही दिवसांपासून पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याच्या मुद्द्यावरून सोशल मीडियावर जोरदार वाद पेटला असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना यावरून मोठ्या प्रमाणावर ट्रोलिंगला सामोरे जावे लागत आहे. पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिसळल्यामुळे वाहनांचे इंजिन बिघडत असल्याचा आरोप करत अनेक वाहनचालकांनी आणि नागरिकांनी या धोरणाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे.
याच वातावरणात नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्यावर असाही वैयक्तिक आरोप केला गेला की, ते आपल्या मुलाच्या इथेनॉल कारखान्याला आर्थिक फायदा पोहोचवण्यासाठी इंधनात इथेनॉल मिसळण्याच्या निर्णयाचे जोरदार समर्थन करत आहेत. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आता पुढचा क्रमांक नितीन गडकरी यांचाच आहे, असा दावाही काही सोशल मीडिया अकाऊंट्सवरून सातत्याने केला जात होता.
या संपूर्ण वादाच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने एक अत्यंत महत्त्वाचा आणि कायदेशीरदृष्ट्या दिलासादायक निर्णय दिला आहे. नितीन गडकरी यांच्याविरोधात एआय तंत्रज्ञान आणि ‘डीपफेक’ व्हिडिओच्या माध्यमातून दिशाभूल करणारा व बदनामीकारक मजकूर पसरवला जात आहे.
याप्रकरणी न्यायालयात याचिका दाखल करून अशी मागणी करण्यात आली होती की, इथेनॉल धोरण आणि E20 बाबत पसरवण्यात येणारी चुकीची माहिती सोशल मीडियावरून तात्काळ हटवण्यात यावी.
याचिकेत स्पष्ट करण्यात आले की, पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याचा निर्णय हा केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाच्या अखत्यारित येतो आणि यामध्ये नितीन गडकरी (Nitin Gadkari) किंवा त्यांच्या रस्ते वाहतूक मंत्रालयाचा कोणताही प्रत्यक्ष हस्तक्षेप नाही.
या सर्व बाबींची दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाने नितीन गडकरी यांना मेटा (फेसबुक/इन्स्टाग्राम), गुगल (युट्यूब) आणि एक्स (ट्विटर) यांसारख्या बलाढ्य सोशल मीडिया कंपन्यांविरोधात दिवाणी खटला दाखल करण्याची परवानगी दिली आहे.
दुसरीकडे, या वादाची व्याप्ती डिजिटल प्लॅटफॉर्मवर दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या सोशल मीडियावरील आंदोलनाला मिळालेल्या प्रतिसादानंतर आता ‘E20 जनता पार्टी’ नावाने एका नव्या ट्रेंडची एन्ट्री झाली आहे.
या ‘E20 जनता पार्टी’ने युजर्सच्या भावना लक्षात घेऊन एक नवी मागणी लावून धरली आहे. देशातील प्रत्येक पेट्रोल पंपावर E20 मिश्रित पेट्रोलसोबतच १०० टक्के शुद्ध पेट्रोलचा पर्यायही उपलब्ध करून देण्यात यावा, जेणेकरून वाहनचालकांना त्यांच्या वाहनाच्या गरजेनुसार इंधन निवडण्याचे स्वातंत्र्य मिळेल, अशी प्रमुख मागणी या पार्टीकडून केली जात आहे.
E20 जनता पार्टीच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
- देशातील प्रत्येक पेट्रोल पंपावर E20 सोबत 100 टक्के शुद्ध (इथेनॉल-फ्री) पेट्रोल उपलब्ध करावे.
- वाहन उत्पादकांनी ज्या इंधनाची शिफारस केली आहे, तेच इंधन ग्राहकांना उपलब्ध करून द्यावे.
- सामान्य नागरिकांच्या वाहनांवर कोणतेही इंधनविषयक प्रयोग सक्तीने लादू नयेत.
- ग्राहकांना आपल्या गरजेनुसार इंधन निवडण्याचे स्वातंत्र्य मिळावे.
- आमची वाहने प्रयोगशाळा नाहीत; त्यामुळे त्यांच्यावर प्रयोग करू नयेत.






