E20 Janta Party : सीजेपी आंदोलनाच्या यशानंतर ‘E20 जनता पार्टी’ची स्थापना; दिल्लीत ‘या’ दिवशी संसद मार्च निघणार
E20 Janta Party : . सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (ट्विटर) आणि इंस्टाग्रामवर या पक्षाचे फॉलोअर्स वेगाने वाढत आहे

E20 Janta Party : नीट पेपरफुटीनंतर कॉकरोच जनता पार्टी (CJP) च्या नेतृत्वाखाली दिल्लीतील जंतर-मंतरवर 36 दिवस सुरू असलेल्या आंदोलनाला मोठे यश मिळाले. मोठ्या आंदोलनानंतर अखेर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला त्यांच्या जागी प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण विभागाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. सीजेपीच्या या अभूतपूर्व यशानंतर आता ‘E20 जनता पार्टी’ (E20JP) नावाचा नवीन गट मैदानात उतरला आहे. (E20 Janta Party)
सोशल मीडियावर पेट्रोलमध्ये एथेनॉल मिश्रण (E20) करण्याविरोधात दीर्घकाळापासून विरोध सुरू होता. यावरून काही गटांनी निदर्शनेही केली होती. आता या मुद्द्यावर एक पक्षच स्थापन झाला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (ट्विटर) आणि इंस्टाग्रामवर या पक्षाचे फॉलोअर्स वेगाने वाढत आहेत. अवघ्या काही तासांतच X वर याचे फॉलोअर्स २२ हजारांहून अधिक तर इंस्टाग्रामवर ३० हजारांहून अधिक झाले आहेत. (E20 Janta Party)
पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिश्रण करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला विरोध करत, वाहनधारकांना 100 टक्के शुद्ध पेट्रोल खरेदी करण्याचा कायदेशीर पर्याय उपलब्ध करून द्यावा, या मागणीसाठी उपोषण सुरू करण्यात येणार आहे. कॉकरोच जनता पार्टीची मागणी नीट (NEET) पेपर लीकप्रकरणी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची होती, त्याचप्रमाणे E20 जनता पार्टीची मागणी शुद्ध पेट्रोल देण्याबाबत करण्यात आली आहे. (E20 Janta Party)
X वर E20 जनता पार्टीने पोस्ट केले आहे, “आमच्या गाड्यांवर प्रयोग करणे बंद करा! भारताला इंधनाची निवड करण्याचा अधिकार हवा आहे. आमच्या गाड्या टेस्ट मशीन नाहीत. आम्ही त्या वर्षांपूर्वी कर भरून स्वतःच्या कष्टाच्या पैशांनी खरेदी केल्या आहेत.”
४ ऑगस्ट रोजी दिल्लीत संसद मार्च (E20 Janta Party)
दुसरीकडे, E20 इंधन धोरणाच्या विरोधात देशभरातील टॅक्सी चालक आणि टूर ऑपरेटर्स ४ ऑगस्ट रोजी दिल्लीत संसद मार्च काढणार आहेत. दिल्ली टॅक्सी अँड टुरिस्ट ट्रान्सपोर्टर्स असोसिएशनने या आंदोलनाची घोषणा केली असून, E20 इंधनामुळे वाहनांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होत असल्याचा दावा केलाय. संघटनेने E20 धोरणाचा फेरआढावा, 80 किमी वेगमर्यादा रद्द, स्क्रॅपेज धोरणात सुधारणा, BS-IV डिझेल वाहनांवरील निर्बंध शिथिल करणे, VLTD प्रणालीची चौकशी आणि राष्ट्रीय महामार्गावरील टोल शुल्क कमी करणे अशा सहा प्रमुख मागण्या सरकारसमोर ठेवल्या आहेत.
E-20 पेट्रोलला विरोध का केला जात आहे ? (E20 Janta Party)
सरकारच्या 20 टक्के इथेनॉल मिश्रणामुळे जुन्या आणि नवीन वाहनांच्या इंजिनचे मोठे नुकसान होत आहे. वाहनांची मायलेज क्षमता कमालीची घटली असून, इंजिनमध्ये बिघाड होण्याचे प्रमाण वाढले आहे. ग्राहकांना समान किंवा अधिक किंमत मोजूनही कमी दर्जाचे इंधन दिले जात असल्याचा दावा या पक्षाकडून करण्यात येत आहे.
काय आहेत प्रमुख तीन मागण्या? (E20 Janta Party)
- पेट्रोल पंपांवर ग्राहकांना E20 ऐवजी 100 टक्के शुद्ध पेट्रोल निवडण्याचा स्पष्ट आणि कायदेशीर पर्याय उपलब्ध करून देण्यात यावा.
- जर सरकार इथेनॉल मिश्रित इंधन (E20) विकत असेल, तर त्याचा उत्पादन खर्च कमी असल्याने ग्राहकांना ते स्वस्त दरात मिळाले पाहिजे.
- प्रत्येक इंधन पंपावर कोणत्या नोझलमध्ये किती टक्के इथेनॉल आहे, याचे स्पष्ट फलक लावले जावेत.
सरन्यायाधीशांच्या वक्तव्यावरून झाली होती CJP ची स्थापना
काही काळापूर्वी सरन्यायाधीश (CJI) सूर्यकांत यांनी एका सुनावणीदरम्यान कॉकरोचसंदर्भात एक विधान केले होते. यावरूनच वादाला सुरुवात झाली आणि नंतर त्यावेळी अमेरिकेत असलेल्या अभिजित दीपके यांनी सोशल मीडियावर ‘कॉकरोच जनता पार्टी’ स्थापन केली. X आणि इंस्टाग्राम या दोन्ही ठिकाणी याला मोठा पाठिंबा मिळाला आणि फॉलोअर्स वेगाने वाढले.
यानंतर, दीपके भारतात परतल्यावर त्यांनी नीट पेपर लीकविरोधात आंदोलनाची घोषणा केली. सुरुवातीला अनेक शहरांत निदर्शने झाली आणि नंतर जंतर-मंतरवर दीर्घकाळ आंदोलन चालले. यामध्ये ‘संसद चलो’ मार्चमध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी एकत्र आले. विद्यार्थ्यांची संख्या सतत वाढत राहिल्याने धर्मेंद्र प्रधान यांनी शनिवारी मंत्रीपदाचा राजीनामा दिला. यानंतर आता करोडो वाहनधारकांचा विचार करता ‘E20 जनता पार्टी’ नवा गट स्थापन करण्यात आला आहे.
हेही वाचा:





