पुणे : “म्युकरमायकोसिस” रुग्णसंख्या आटोक्यात

पुणे – करोनातून बरे झाल्यानंतर उद्भवणाऱ्या म्युकरमायकोसिस आजाराचे रुग्ण पुणे, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागात आता आटोक्यात आले आहेत. शहरासह जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचे जूनमध्ये 426 रुग्ण होते. त्यामध्ये ऑगस्टमध्ये घट होऊन 95 रुग्ण आढळले आहेत. सध्या 208 जणांवर उपचार सुरू आहेत.
सध्या पुण्यात 61, पिंपरी-चिंचवडमध्ये 53, ग्रामीण भागात सात, तर ससून रुग्णालयात 87 अशा 208 जणांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत पुण्यात 408, पिंपरी-चिंचवडमध्ये 207, ग्रामीण भागात 68 आणि ससून रुग्णालयात 308 अशा 991 रुग्णांना उपचारांनंतर घरी सोडण्यात आले आहे.
शहरासह जिल्ह्यात 205 जणांचा म्युकरमायकोसिसमुळे मृत्यू झाल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. करोनातून बरे झालेल्यांमध्ये म्युकरमायकोसिसचा आजार बळावतो. हा आजार संसर्गजन्य नसला, तरी तो तोंड, डोळे आणि मेंदूवर आघात करणारा आहे. या आजारावर उपचार करताना मोठा खर्च होतो. त्यामुळे पात्रतेनुसार महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ दिला जातो.





