Pune MSRTC: आजी-आजोबांची ‘लाल परी’ला पहिली पसंती! अवघ्या ५ महिन्यांत तब्बल ४२ लाख ज्येष्ठांचा प्रवास
Pune MSRTC: अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेला पुणे जिल्ह्यात उदंड प्रतिसाद; ६० ते ७४ वयोगटातील प्रवाशांपेक्षा ७५ वर्षांवरील प्रवाशांची संख्या तिप्पट.

Pune MSRTC – मोफत आणि सवलतीच्या बस प्रवास योजनांना पुणे विभागातील ज्येष्ठांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. गेल्या पाच महिन्यांत पुणे जिल्ह्यातून तब्बल ४२ लाख ३९ हजार ४१४ ज्येष्ठांनी एसटी बसचा प्रवास केला आहे. या प्रतिसादामुळे एसटीच्या पुणे विभागाच्या तिजोरीत तब्बल २९ कोटी ५६ लाख ६ हजार ६३९ रुपयांचा महसूल जमा झाला आहे. अमृत ज्येष्ठ नागरिक योजना अंतर्गत ७५ वर्षांवरील वृद्धांना साध्या बसेसपासून ते वातानुकूलित शिवनेरीपर्यंत मोफत प्रवासाची सवलत आहे.
६० ते ७४ वयोगटातील नागरिकांना तिकीट दरात ५० टक्के सवलत दिली जाते. त्यानुसार अर्ध्या तिकिटात प्रवास करणाऱ्यांपेक्षा मोफत प्रवास करणाऱ्या ७५ वर्षांवरील अमृत ज्येष्ठांची संख्या जवळपास तिप्पट आहे. गेल्या पाच महिन्यांत ३२ लाख २१ हजार ४७ अमृत ज्येष्ठांनी मोफत प्रवास केला असून, त्यांच्या बदल्यात महामंडळाला शासनाकडून २४ कोटी ३८ लाख १९ हजार ९५९ रुपयांचा महसूल मिळाला. (Pune MSRTC)
Pune MSRTC: आजी-आजोबांची ‘लाल परी’ला पहिली पसंती! अवघ्या ५ महिन्यांत तब्बल ४२ लाख ज्येष्ठांचा प्रवास
५० टक्के सवलतीचा लाभ घेतलेल्या १० लाख १८ हजार ३६७ ज्येष्ठ प्रवाशांकडून ५ कोटी १७ लाख ८६ हजार ६८० रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. पुणे विभागातील ज्येष्ठ आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांनी एसटी प्रवासाला प्राधान्य देत महामंडळाच्या योजनांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. आगामी काळातही जास्तीत जास्त पात्र प्रवाशांनी मोफत आणि ५० टक्के सवलत योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभाग नियंत्रक अरुण सिया यांनी केले आहे. (Pune MSRTC)





