इच्छुकांची संख्याही अधिक, आरक्षणांची संख्या कमी असल्याने चढाओढ पुणे : महापालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या ३४ गावांचे स्वतंत्र प्रभाग न करता या गावांची हद्द जुन्या प्रभागांनाच जोडल्या आहेत. परिणामी, या गावांमधील इच्छुकांना तिकिटासाठी माजी नगरसेवकांचा सामना करावा लागणार होता. आरक्षण सोडतीने या प्रभागांतील चुरस आणखीनच वाढविली आहे. या गावांचा समावेश असलेल्या प्रभागात सर्वाधिक आरक्षणे ओबीसी (खुला), ओबीसी महिला आणि सर्वसाधारण गटासाठी असल्याने इच्छुकांची तिकिटासाठी सर्वच पक्षाकडे झुंबड उडणार आहे. शहराच्या हद्दीलगत असलेली ३४ गावे गेल्या काही वर्षात महापालिकेत समाविष्ट करण्यात आली आहे. यातील दोन गावांत त्यांची स्वतंत्र नगर परिषद झाली असली तरी उर्वरीत ३२ गावांमुळे महापालिकेच्या प्रभागांचा भौगोलिक विस्तार झालेला आहे. त्यातच, प्रभाग रचना आणि आरक्षणासाठी २०११ च्या लोकसंख्येचा आधार घेण्यात आला आहे. यामुळे लोहगावचा समावेश असलेल्या प्रभाग २ मध्ये एससी आरक्षण कमी झाले आहे तर शिवणे आणि परिसर जोडलेल्या प्रभाग ३२ मध्ये एससी आरक्षण नव्याने स्थापित झाले आहे. उर्वरीत बहुतांश गावांचा समावेश असलेल्या प्रभागांमध्ये ओबीसी आणि सर्वसाधारण गटाचे आरक्षण पडले आहे. त्यामुळे, गावांमधून महापालिकेची पायरी चढण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना मोठी संधी मिळणार आहे. त्यामुळे माजी नगरसेवकांनाही या इच्छुकांचा धसका घेतल्याचे सर्वसाधारण चित्र आहे. या गावांमध्ये वाघोली, केळेवाडी, जांभूळवाडी, आंबेगाव, धायरी, सूस, म्हाळूंगे, शिवणे, खडकवासला, किरकटवाडी, लोहगाव, औताडेवाडी,हांडेवाडी, मंतरवाडी, शेवाळेवाडी, मांजरी, केशवनगर या गावांचा समावेश आहे. या गावांमधूनही मोठया प्रमाणात इच्छुक आहे. या इच्छुकांनी गेल्या वर्षभरात वेगवेगळया उपक्रमांच्या माध्यमातून नागरिकांचे प्रश्न मांडत वेगवेगळी आंदोलने करून पक्षांच्या नेत्यांचे आणि वरिष्ठांचे लक्ष वेधून घेतले आहे.