Pune: निम्म्याहून अधिक रुग्ण गर्भवती माता; ‘झिका’च्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून विशेष सर्वेक्षण

पुणे – शहरात ‘झिका’चा प्रादुर्भाव हळूहळू वाढत आहे. सध्याच्या नऊपैकी पाच बाधित या गर्भवती माता असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मनपा आरोग्य विभागाने “झिका’ उद्रेक झालेल्या परिसरातील गर्भवती मातांचे सर्वेक्षण सुरू केले आहे. यातील संशयित रुग्णांचे रक्तनमुने तपासणीसाठी पाठविण्यात आहेत.
गर्भधारणेदरम्यान किंवा बाळाच्या जन्मादरम्यान लैंगिक संबंध, रक्तदान आणि संक्रमित आईपासून तिच्या बाळाला “झिका’ विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता असते. संसर्ग झाल्यास बाळामध्ये मायक्रोसेफली (मेंदूची अपुरी वाढ) सारखे जन्मदोष, तसेच इतर न्यूरोलॉजिकल विकार होऊ शकतात.
त्यापैकी काहींची लक्षणे मूल मोठे झाल्यावर दिसू शकतात. त्यामुळे “झिका’ प्रादुर्भावात गर्भवती मातांची विशेष काळजी घेतली जाते. सध्या बाधित पाचही मातांची डाॅक्टरांच्या देखरेखीखाली तपासणी सुरू आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.
25 जणींचे रक्त नमुने तपासणीसाठी
वारजे-कर्वेनगर, कोथरूड-बावधन, मुंढवा, औंध-बाणेर आणि सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयांतर्गत सापडलेल्या “झिका’ बाधित परिसरात आरोग्य विभागाकडून गर्भवती मातांचे सर्वेक्षण केले जात आहे. त्यामध्ये एकूण गर्भवती मातांची संख्या 682 इतकी आहे. तर झिका उद्रेक झालेल्या भागातील गर्भवती मातांची संख्या 91 आहे. त्यानुसार संशयित 25 जणींचे रक्त नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
गर्भवती मातांनी घ्यावयाची काळजी
– “झिका’प्रभावित भागातील प्रवास टाळावा
– लांब बाह्यांचे शर्ट आणि लांब पँट घाला
– ज्या घरात वातानुकूलित किंवा खिडकीचे पडदे आहेत अशा घरात रहा.
– सुरक्षित असलेले डास प्रतिबंधक औषध वापरा
– लक्षणे दिसतात डाॅक्टरांच्या सल्ला घ्यावा; आवश्यक तपासण्या करून घ्या
– परिसरात पाणी साचणार नाही, याची काळजी घ्या
– डास उत्पत्तीची ठिकाणे नष्ट करा





