Pune: एक हजारांहून अधिक गुन्हे दाखल

पुणे – विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने १ ऑक्टोबर २०२४ पासून १ हजार २६७ गुन्हे नोंदविण्यात आले असून, १ हजार १७९ जणांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत ९८२ वाहनांसह ५ कोटी ५५ लाख ६२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाचे अधीक्षक चरणसिंह राजपूत यांनी दिली आहे.
जिल्ह्यात सराईत गुन्हेगारांविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ चे कलम ९३ अन्वये ५९ प्रस्ताव संबंधित दंडाधिकाऱ्यांकडे दाखल करण्यात आले आहेत. सदर इसमांकडून चांगल्या वर्तणुकीचे बंधपत्र घेण्यात येत असून, आतापर्यंत १२ प्रकरणांत रक्कम ११ कोटी ८० हजार रुपये रकमेची बंधपत्रे घेण्यात आलेली आहेत. या काळात गोवा राज्यनिर्मित मद्याचे तीन गुन्हे उघडकीस आले असून, या गुन्ह्यांमध्ये ४१ लाख ७७ हजार ३०५ रुपये किमतीचा मुद्देमाल २ वाहनांसह जप्त करण्यात आला आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे, राज्य उत्पादन शुल्कचे अंमलबजावणी आणि दक्षता सहआयुक्त प्रसाद सुर्वे यांच्या मार्गदर्शन आणि सूचनेनुसार १ ऑक्टोबरपासून विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध पथके तयार करण्यात आली आहेत. या पथकांकडून जिल्ह्यातील सर्व हातभट्टी निर्मित मद्य, वाहतूक, विक्री, तसेच धाबे, अवैध ताडी धंदे यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे.
जिल्ह्यात कार्यक्षेत्रामध्ये वारंवार सखोल तपासणी करून नियमबाह्य बाबी आढळल्यास संबंधिताविरुद्ध नियमातील तरतुदीनुसार कठोर कारवाई करण्यासाठी विशेष निरीक्षण मोहीम राबविण्यात येत आहे. शासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी २४ तास गस्त घालण्यात येत आहे. जिल्ह्यात अवैध मद्य वाहतुकीस आळा घालण्याच्या दृष्टीने एकूण १८ तात्पुरते चेकनाके उभारून संशयित वाहनांची तपासणी करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.





