Pune Model School: ग्रामीण भागातील शाळांचा कायापालट होणार; ‘पुणे मॉडेल स्कूल’ अंतर्गत भोर तालुक्यातील १२ शाळांच्या कामांना गती
Pune Model School: जिल्हा परिषद सदस्या स्वरूपा थोपटे यांनी संबंधित शाळांना प्रत्यक्ष भेट देऊन सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला.

Pune Model School – ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक व दर्जेदार शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने पुणे जिल्हा परिषदेमार्फत ‘पुणे मॉडेल स्कूल’ हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत कारी-उत्रोली जिल्हा परिषद गटातील अनेक प्राथमिक शाळांच्या नवीन इमारती व दुरुस्तीच्या कामांना आता गती मिळणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद सदस्या स्वरूपा थोपटे यांनी संबंधित शाळांना प्रत्यक्ष भेट देऊन सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला.
या उपक्रमांतर्गत अंबाडे, नेरे, धावडी, बाजारवाडी, शिरवली तर्फे भोर, आंबेघर, करंजे, कारी, नाझरे, आंबवडे, कर्नावड व कोर्ले येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांसाठी नवीन इमारती तसेच आवश्यक त्या ठिकाणी इमारत दुरुस्तीची कामे मंजूर करण्यात आली आहेत. मंजूर कामांना गती देण्यासाठी आणि पुढील नियोजन निश्चित करण्यासाठी जिल्हा परिषद सदस्या स्वरूपा थोपटे,
भोर पंचायत समितीच्या सदस्या गीता आंबवले व सदस्या सुषमा चव्हाण यांनी संबंधित प्रशासकीय अधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत प्रत्यक्ष स्थळ पाहणी केली. या पाहणीदरम्यान नवीन इमारतींच्या जागेची निश्चिती, वास्तुरचना (आर्किटेक्चरल डिझाइन), बांधकामाचा दर्जा आणि कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
“विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि गावांच्या सर्वांगीण विकासासाठी ‘पुणे मॉडेल स्कूल’ उपक्रम अत्यंत महत्त्वाचा मैलाचा दगड ठरणार आहे. ग्रामीण भागात दर्जेदार शैक्षणिक सुविधा निर्माण करण्यासाठी ही सर्व मंजूर कामे गुणवत्तापूर्ण आणि ठरवून दिलेल्या वेळेतच पूर्ण केली जातील.”
– स्वरूपा थोपटे, सदस्या, पुणे जिल्हा परिषद.





