Newasa News : शिक्षणमहर्षी साहेबराव घाडगेपाटील यांच्या जयंतीनिमित्त त्रिमूर्ती शैक्षणिक संकुलात विविध मान्यवारांकडून अभिवादन!
स्व. साहेबराव घाडगेपाटील यांच्या ७३ व्या जयंतीनिमित्त आज नेवासे तालुक्यात (Newasa News) आणि त्रिमूर्ती शिक्षण संस्थेच्या प्रत्येक संकुलात विविध सामाजिक, धार्मिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांच्या वतीने त्यांना भावपूर्ण अभिवादन करण्यात आले.

Newasa News : उभ्या आयुष्यात कधीही जात-पात, धर्म न मानता केवळ माणुसकी हाच खरा धर्म मानणारे, गरिबी-श्रीमंती किंवा उच्च-नीच असा कोणताही भेदभाव न करता सर्वसामान्यातल्या सामान्य माणसाला नेहमी आदराचे स्थान देणारे एक निर्भीड आणि प्रेमळ व्यक्तिमत्त्व, म्हणजेच त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान शिक्षण संस्थेचे संस्थापक महामेरू स्व. साहेबराव घाडगेपाटील.
त्यांच्या ७३ व्या जयंतीनिमित्त सोमवार (दि. १३) रोजी नेवासे तालुक्यात (Newasa News) आणि त्रिमूर्ती शिक्षण संस्थेच्या प्रत्येक संकुलात विविध सामाजिक, धार्मिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांच्या वतीने त्यांना भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. साहेबराव घाडगेपाटील मित्र मंडळाच्या वतीनेही तालुक्यात ठीकठिकाणी त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला.
मुलींसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे दिमाखात उद्घाटन
या जयंतीचे औचित्य साधून (Newasa News) त्रिमूर्तीनगर येथे मुलींसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आणि स्व. साहेबराव घाडगेपाटील यांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात आले. नेवासे नगरपंचायतीचे नगराध्यक्ष डॉ. करणसिंह घुले यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.
मुलींच्या आरोग्य संवर्धनासाठी आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमास विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरात मुलींची रक्तदाब, रक्तातील साखर, हिमोग्लोबिन आणि रक्तगट तपासणी करण्यात आली. तसेच तज्ज्ञ डॉक्टरांनी मुलींना आरोग्यदायी जीवनशैली, संतुलित आहार आणि नियमित व्यायामाचे महत्त्व पटवून दिले.
“निरोगी विद्यार्थी हेच सशक्त राष्ट्राची ताकद” – नगराध्यक्ष डॉ. करणसिंह घुले
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी त्रिमूर्ती शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्षा ॲड. स्नेहल घाडगे–चव्हाण पाटील होत्या. याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना उद्घाटक नगराध्यक्ष डॉ. करणसिंह घुले म्हणाले, “निरोगी विद्यार्थी हेच सशक्त समाज आणि राष्ट्राची खरी ताकद आहे. आजच्या काळात शिक्षणासोबतच आरोग्याची जपवणूक करणे ही काळाची गरज असून, अशा उपक्रमांमुळे मुलींमध्ये आरोग्याविषयी मोठी जागरूकता निर्माण होते.”
तज्ज्ञ डॉक्टरांचा आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश
यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भागवत दहिफळे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “निरोगी मुलगी म्हणजे निरोगी कुटुंब आणि भावी सुदृढ समाजाचा पाया आहे.” त्यांनी मुलींना जीवनात मिठाचे प्रमाण कमी ठेवण्याचा, मानसिक आरोग्य जपण्याचा आणि तणावमुक्त राहण्याचा मोलाचा सल्ला दिला. तसेच अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेजच्या डॉ. शैलजा भदगले यांनी नियमित व्यायाम, योग आणि पौष्टिक आहाराचा दैनंदिन जीवनात वापर कसा करावा, याचे सविस्तर मार्गदर्शन केले.
मान्यवरांची मोठी उपस्थिती
या प्रसंगी (Newasa News) त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानच्या अध्यक्षा ॲड. सुमती घाडगे पाटील, डॉ. शितल बर्डे, डॉ. चंद्रशेखर रौंदळ, डॉ. चेतना कानडे, डॉ. सारिका गोरे, डॉ. सागर डोखे, तसेच त्रिमूर्ती वरिष्ठ कॉलेजचे प्राचार्य डॉ. चांगदेव आरसुळे, संस्थेच्या समन्वयक डॉ. अनुराधा गोरे, प्राचार्य सोपनराव काळे, संजयसिंग चौहान, डॉ. धनंजय आरसुळे, प्रा. जोसेफ आणि डॉ. संध्या भंगाळे यांच्यासह विविध महाविद्यालयांचे प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संयुक्त विद्यमाने यशस्वी आयोजन
“आरोग्याची काळजी, प्रगतीची गुरुकिल्ली!” हा संदेश देणारे हे आरोग्य शिबिर त्रिमूर्ती सिनिअर कॉलेज, फार्मसी कॉलेज, मुलींचे बी.एड. कॉलेज आणि मुलांचे बी.एड. कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केले होते. या उपक्रमासाठी तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, पंचायत समिती नेवासे तसेच अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज (देवगड फाटा) यांचे विशेष सहकार्य लाभले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. चांगदेव आरसुळे यांनी केले, सूत्रसंचालन प्रा. मनीषा घावटे व प्रा. कोमल केने यांनी केले, तर उपस्थितांचे आभार डॉ. संध्या भंगाळे यांनी मानले. एकंदरीत, स्व. साहेबराव घाडगेपाटील यांच्या समाजसेवेच्या विचारांना उजाळा देणारा आणि संस्थेची सामाजिक बांधिलकी अधोरेखित करणारा हा उपक्रम ठरला.






