Pune : बेपत्ता अल्पवयीन मुलगी जबलपूरमध्ये मृतावस्थेत

पुणे – शहरातून २५ दिवसांपूर्वी रहस्यमयरित्या गायब झालेली १४ वर्षीय मुलगी मध्यप्रदेशातील जबलपूरमध्ये मृतावस्थेत आढळली. ती ज्या तरुणाबरोबर पळून गेली होती तो तरुण नागपूर रेल्वे स्थानकावर बेशुध्दावस्थेत आढळला आहे.
मुलगी मध्य प्रदेशातील नैनपूर रेल्वे स्थानकावर शहडोल-इतवारी एक्स्प्रेसमध्ये बेशुद्धावस्थेत आढळली.
जबलपूरच्या व्हिक्टोरिया रुग्णालयात उपचार सुरू असताना तिचा १७ जून रोजी मृत्यू झाला. दोघे जेथे आढळले त्या रेल्वे स्थानकादरम्यान ५०० किलो मीटरचे अंतर आहे. यामुळे एकत्र निघालेले दोघे एवढ्या अंतरावर बेशुद्धावस्थेत कसे सापडले हा प्रश्न निर्माण झाला आहे.
शवविच्छेदन अहवालात मुलीच्या शरीरात विषारी पदार्थ आढळले आहेत. यामुळे ही आत्महत्या की कोणीतरी कट करून दोघांना मारले, या दिशेने पोलीस तपास करत आहेत. विशेष म्हणजे हीच मुलगी सात महिनेआधी एका तरुणासोबत पळून गेली होती. त्यावेळी पोक्सो कायद्यांतर्गत आरोपीला अटक करून येरवडा कारागृहात पाठवले होते. त्यानंतर २४ मे रोजी ती पुन्हा २२ वर्षीय तरुणासोबत बेपत्ता झाली. हा तरुण तिचा नातेवाईक असून तो अहिल्यानगरला एका हॉटेलमध्ये काम करत होता.
काय घडलं नेमकं?
बंडगार्डन ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्यानंतर पालकांनी अपहरणाचा गुन्हा नोंद केला. मोबाईलचे लोकेशन तपासले, तेव्हा ती अहिल्यानगरमध्ये नातेवाईक तरुणासोबत असल्याचे समजले. तपासात लोकेशन मुंबई, नागपूर असे आढळल्यानंतर दोघांचे मोबाईल बंद झाले. उत्तर प्रदेश रेल्वे पोलिसांना १३ जून रोजी नैनपूर स्थानकाजवळ रेल्वेमध्ये मुलगी बेशुद्धावस्थेत सापडली.
जबलपूरमध्ये उपचारासाठी दाखल केल्यावर तिने आपण बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहत असल्याचे सांगितले. माहिती कळाल्यावर बंडगार्डन पोलीस तेथे पोहोचेपर्यंत तिचा मृत्यू झाला होता. त्याचवेळी, तिच्यासोबतचा तरुण नागपूर स्थानकावर रेल्वेत बेशुद्धावस्थेत आढळला. दोघांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची शक्यता पोलिसांना वाटत आहे.
बंडगार्डनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र गायकवाड म्हणाले की, मोबाइल कॉल, सीसीटीव्ही फुटेज, वैद्यकीय अहवाल आणि मृत्युपुर्वीचा मुलीच्या जबाबावर तपास सुरू आहे. नागपूरमध्ये आढळलेल्या तरुणाची परिस्थिती गंभीर असल्याने जबाब नोंदवला नाही. सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते तपास करत आहेत





