Pune : ई-चलन प्रणालीत जाचक अटी लादू नये; मंत्री प्रताप सरनाईक यांच्या परिवहन विभागाला सूचना

पुणे – व्यावसायिक वाहतूकदारांच्या वाहनांचा ई-चलनविषयक समस्यांचे निराकरण करण्यासाठी परिवहन विभागाने समिती गठीत करावी आणि एका महिन्यात समितीने अहवाल सादर करावा, असे आदेश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले. ई-चलन प्रक्रिया सुधारणासंदर्भात आयोजित बैठकीत अतिरिक्त मुख्य सचिव (परिवहन ) गृह विभाग संजय सेठी, परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी, विविध वाहतूक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी परिवहन मंत्री सरनाईक म्हणाले की, ई- चलन प्रणालीत सुधारणा करताना प्राधान्याने वाहनचालक व मालक यांना नियमांचे पालन करण्यास प्रोत्साहन देणारे निकष असावे, त्यात कुठेही जाचक अटी लादू नये. एकाच दिवसात एका कारणासाठी वेगवेगळी चलन वसूल करू नये. त्यासाठी चलनाचा ग्राह्यता कालावधी निश्चित करावा, व्यावसायिक वाहनांना पार्किंग सुविधा उपलब्ध करून द्यावी.
वाहतूक संघटनांच्या समस्या सोडवण्यासाठी परिवहन विभाग, पोलीस आणि संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांची संयुक्त समिती गठीत करावी, त्यामध्ये वाहतूक संघटनांच्या प्रतिनिधींचा सहभाग घ्यावा, जेणेकरून समितीच्या कामात पारदर्शकता व सर्वसमावेशकता येईल. पोलिस विभागमार्फत करण्यात येणाऱ्या कारवाईत सध्याच्या ई-चलन निकषात शिथिलता आणावी.
परिवहन विभागाच्या परित्रकाच्या निकषानुसार पोलिसांनीदेखील आवश्यक तिथेच कार्यवाही करावी. चलन लावताना लाइव्ह फोटो अपलोड करावे, रिअल टाइम फोटो घ्यावेत. अनावश्यक, नाहक कारवाई करणे थांबवावे, अशा सूचना परिवहन मंत्री सरनाईक यांनी दिल्या आहेत.





