Pune : मेट्रो स्थानकांवर पोहचणे होणार सोपे; पाच मेट्रो स्टेशन्सवर नवीन प्रवेशद्वार सुरू

पुणे – मेट्रोच्या पाच स्थानकांसाठी आणखी प्रत्येकी एक नवीन प्रवेश तसेच बाहेर पडण्याचे द्वार सुरू केले आहे. यामध्ये पीएमसी, छत्रपती संभाजी महाराज उद्यान, डेक्कन जिमखाना, बोपोडी आणि कल्याणीनगर मेट्रो स्टेशनचा समावेश आहे.
या सर्व ठिकाणी एकच प्रवेशद्वार असल्याने प्रवाशांची गैरसोय होत होती. तसेच प्रवाशांना काही ठिकाणी वळसा मारून स्थानकांपर्यत पोहचावे लागत होते. मात्र, या प्रवेशद्वारामुळे ही गैरसोय दूर होण्यास मदत होणार आहे. या पाचही ठिकाणी महामेट्रोकडून एकच बाजूने प्रवेश तसेच बाहेर पडण्याचा मार्ग होता. त्यामुळे या स्थानकांवर प्रवाशांना पोहचताना तसेच बाहेर पडताना वर्दळीच्या रस्त्यांवरून जीव मुठीत घेऊन स्थानक गाठावे लागत होते.
मात्र, आता महापालिका स्थानकावर प्रवाशांना मेट्रोतून उतरून थेट पादचारी पूलावरून शिवाजी पुलावर जाता येणार आहे. तसेच शिवाजी पुलावरूनच थेट स्टेशनमध्ये येता येणार आहे. तर डेक्कन जिमखाना स्थानकात जाण्यासाठी प्रयाग हाॅस्पिटलच्या बाजूला जंगली महाराज रस्त्यावर प्रवेशद्वार असणार असल्याने प्रवाशांना डेक्कन चौकात येण्याची गरज असणार नाही. तसेच छत्रपती संभाजी उद्यान मेट्रो स्टेशन स्थानकात जाण्यासाठी आता बालगंधर्व चौकात न जाता छ्त्रपती संभाजी महाराज उद्यानाच्या प्रवेशद्वाराच्या पलिकडे आणखी एक प्रवेशद्वार असणार आहे.





