Pune Metro – शिवाजीनगर-हिंजवडी ही पीपीपी मॉडेलवरील देशातील पहिली मेट्रो लवकरच पुणेकरांच्या सेवेत येईल. या २३ किलोमीटरच्या मेट्रो मार्गिकेची चाचणी यशस्वी झाली असल्याचे केंद्रीय नागरी विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री खासदार मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले. गोखलेनगर येथील शहीद तुकाराम ओंबाळे क्रीडांगणावर आयोजित १६ व्या ‘जनता दरबारात’ ते बोलत होते. मोहोळ यांनी नागरिकांचे प्रश्न ऐकून घेत त्यावर तातडीने तोडगा काढण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. यावेळी महापौर मंजुषा नागपुरे, आमदार सिद्धार्थ शिरोळे, उपमहापौर परशुराम वाडेकर, सभागृह नेते गणेश बिडकर यांसह महापालिका, पोलिस तसेच केंद्र व राज्य सरकारच्या विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. शहराचा सर्वांगीण विकास करून त्याला देशातील सर्वोत्तम शहर बनवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे सांगत मुरलीधर मोहोळ म्हणाले, शहराचा खासदार या नात्याने मी आणि पालकमंत्री सुनेत्रा पवार पुणेकरांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील आहोत. पुणेकरांनी दाखविलेला विश्वास महायुती सार्थ ठरवित आहे. नागरिकांना दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरण जनता दरबारच्या माध्यमातून केले जात असल्याचे मोहोळ यांनी सांगितले. पुण्यातील वनाज ते रामवाडी मेट्रो मार्गिकेचा वाघोलीपर्यंत आणि पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट मेट्रो मार्गिकेचा कात्रजपर्यंत विस्तार होणार आहे. तर खडकवासला-खराडी आणि माणिकबाग ते नळस्टॉप या नवीन मार्गिकांना केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम होऊन शहरातील वाहतूक कोंडी दूर होईल, अशी माहिती मुरलीधर मोहोळ यांनी दिली.