Pune Metro: मेट्रो राजगुरुनगर-पानमळापर्यंत धावणार; महामेट्रोच्या डीपीआर बैठकीत काय घडलं?
Pune Metro: नाशिक फाटा-चाकण मेट्रो मार्गिका राजगुरुनगर व पानमळापर्यंत विस्तारण्याची आमदार बाबाजी काळे यांची ठाम मागणी.
Pune Metro – खेड तालुक्याच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी प्रस्तावित निगडी भक्ती-शक्ती चौक-मुकाई चौक-वाकड-नाशिक फाटा-संत तुकाराम नगर-गवळीमाथा-लांडेवाडी-भोसरी-चाकण मेट्रो मार्गिका राजगुरुनगर व पानमळापर्यंत विस्तारण्यात यावी, अशी ठाम मागणी आमदार बाबाजी काळे यांनी मेट्रोच्या सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) सादरीकरण बैठकीत केली.
या बैठकीत त्यांनी ऑनलाइन व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सहभाग घेत खेड तालुक्याच्या हिताचे विविध मुद्दे मांडले. आमदार काळे यांनी यापूर्वीही महाराष्ट्र विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात नाशिक फाटा-चाकण-राजगुरुनगर-पानमळा मेट्रो मार्गास मंजुरी देण्याची मागणी केली होती. त्याच मागणीचा सातत्याने पाठपुरावा करत डीपीआर तयार करण्याच्या टप्प्यावरही त्यांनी दीर्घकालीन विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण सूचना मांडल्या.
बैठकीत बोलताना त्यांनी सांगितले की, चाकण हे देशातील महत्त्वाचे औद्योगिक केंद्र असून येथे दररोज हजारो कामगार, विद्यार्थी, उद्योजक आणि नागरिकांची मोठ्या प्रमाणावर ये-जा असते. त्यामुळे मेट्रो मार्ग केवळ चाकणपर्यंत मर्यादित न ठेवता राजगुरुनगर आणि पानमळापर्यंत विस्तार करण्याचा दूरदृष्टीने विचार करणे आवश्यक आहे. तसेच तळवडे-निघोज-म्हाळुंगे-चाकण या मार्गाचाही मेट्रोच्या नियोजनात समावेश करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली.
खेड तालुक्यातील नागरिकांना मेट्रोचा अधिकाधिक लाभ मिळावा यासाठी सुलभ मल्टी-मोडल कनेक्टिव्हिटी, प्रशस्त पार्किंग व्यवस्था, फीडर बस सेवा, औद्योगिक क्षेत्रांशी प्रभावी जोडणी तसेच भविष्यातील विस्ताराचा स्पष्ट आराखडा डीपीआरमध्ये समाविष्ट करण्याची सूचनाही त्यांनी केली. प्रस्तावित मेट्रो मार्गिकेची एकूण लांबी 45.215 किलोमीटर असून त्यामध्ये 34 स्थानकांचा समावेश आहे.
खेड तालुक्यात चिंबळी फाटा, बर्गे वस्ती, कुरुळी, आळंदी फाटा, नाणेकरवाडी आणि चाकण अशी सहा स्थानके प्रस्तावित आहेत. खेड तालुक्याच्या दीर्घकालीन विकासासाठी, औद्योगिक प्रगतीसाठी आणि नागरिकांच्या सोयीसाठी मेट्रो प्रकल्पात आवश्यक सुधारणा व विस्तार व्हावा, यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहणार असल्याचा पुनरुच्चारही आमदार काळे यांनी केला.
या बैठकीस खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, आमदार शंकर जगताप, आमदार उमाताई खापरे, महापौर रवी लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर तसेच महामेट्रो आणि संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
“खेड तालुक्याच्या वाढत्या औद्योगिक, शैक्षणिक आणि नागरी गरजा लक्षात घेता आधुनिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही काळाची गरज आहे. नाशिक फाटा-चाकण-राजगुरुनगर-पानमळा मेट्रो मार्ग साकार झाल्यास वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल, उद्योगांना चालना मिळेल, रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील आणि नागरिकांचा प्रवास अधिक सुरक्षित, जलद व सुलभ होईल. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी माझा सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरूच राहील.”
– बाबाजी काळे, आमदार खेड-आळंदी






