Pune : शिक्षक पदभरतीसाठी गुणवत्ता यादी जाहीर

पुणे – शालेय शिक्षण विभागाच्या वतीने पवित्रप्रणालीअंतर्गत मुलाखतीसहच्या शिक्षक पदभरतीसाठी गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे. राज्यातील १ हजार ८६१ व्यवस्थापनातील ८ हजार ५५६ रिक्त पदांपैकी ८ हजार २६४ पदांसाठी १२ हजार ९६६ उमेदवारांची त्यांनी निवड केलेल्या प्राधान्यक्रमातील उपलब्धतेच्या अधीन राहून शिफारस करण्यात आली आहे.
पवित्रप्रणालीअंतर्गत शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२२ नुसार शिक्षक पदभरतीची कार्यवाही करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यामध्ये २१ हजार ६७८आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये मुलाखतीशिवाय या प्रकारांतील पदभरतीची कार्यवाही करण्यात आली. आता, दुसऱ्या टप्प्यांतर्गत मुलाखतीसह पदभरतीची कार्यवाही करण्यासाठी व्यवस्थापनांना मुलाखत व अध्यापन कौशल्य यांसाठी सर्वसाधारण गुणवत्ता यादी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
मुलाखत व अध्यापन कौशल्य यांसाठी एकूण ३० गुणांची तरतूद करण्यात आली आहे. पात्र, उमेदवाराची शिक्षक पदावर निवड करण्यासाठी शैक्षणिक संस्थास्तरावर विविध प्रकारची कार्यपद्धती अवलंबिण्यात येत होती. अशा परिस्थितीत शिक्षक पदभरतीमध्ये एकवाक्यता साधण्याच्या दृष्टीने व उमेदवारांचे योग्यरित्या मूल्यमापन होण्यासाठी मानक कार्यपद्धतीचा अवलंब करणे आवश्यक आहे. १२ हजार ९६६ उमेदवारांची त्यांनी निवड केलेल्या प्राधान्यक्रमातील उपलब्धतेच्या अधीन राहून जास्तीतजास्त १० प्राधान्यक्रमांसाठी एकूण ७१ हजार ८०२ प्राधान्यक्रमावर शिफारस करण्यात आली आहे.
नियुक्ती प्राधिकारी म्हणून ज्या व्यवस्थापनाने पवित्र पोर्टलवर जाहिरात प्रसिद्ध केलेली होती. परंतु विविध प्रशासकीय कारणास्तव ८१ व्यवस्थापनांच्या एकूण १७७ पदे जाहिरातीतून रद्द करण्यात आलेली आहेत. त्यामुळे या पदांसाठी उमेदवारांची मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी शिफारस होणार नाही. अशा व्यवस्थापनांतील कमी होत असलेल्या रिक्त पदांची माहिती पोर्टलवर प्रसिद्धीस देण्यात आलेली आहे.





