Pune : पुणे जिल्ह्यात पारा ४२ अंशांच्या जवळ

पुणे : ढगाळ वातावरणामुळे घटलेल्या कमाल तापमानात वाढ झाल्याने उष्णतेचा पारा पुन्हा ४० अंशाच्या पुढे गेला. बुधवारी (दि. २६) कमाल तापमानात एक ते दीड अंशाने वाढ झाली शिरूर येथे सर्वाधिक ४१.६ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. तसेच तळेगांव ढमढेरे येथे ४१.४ तर कोरेगांव पार्क परिसरात उष्णतेचा पारा ४०.८ अंशावर पोहचला.
मागील आठवड्यात मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पडलेल्या पावसामुळे हवामानात बदल झाला. कमाल तापमानात तीन ते चार अंशाने घट झाली. परिणामी ४१ अंशाच्या पुढे गेले कमाल तापमान ३६ ते ३७ अंशापर्यंत खाली आहे. त्यामुळे उकाडा वाढला होता आणि रात्री हवेत गारवा वाढला. मात्र, मागील दोन दिवसांपासून हवामान कोरडे असल्यामुळे कमाल तापमानात सतात्याने दोन ते तीन अंशाने वाढ होत आहे. गेल्या २४ तासात अजून एक ते दोन अंशाने वाढ झाल्याने पारा ४२ अंशाच्या जवळपास पोहचला आहे. त्यामुळे दिवसभर उन्हाचा चांगलाच चटका जाणवत होता.
दरम्यान, पुढील तीन दिवस शहरासह जिल्ह्यातील हवामान कोरडे राहील, कमाल व किमान तापमानात काही अंशी वाढ होईल. त्यानंतर आकाश निरभ्र आणि दुपारी किंवा रात्री आकाश ढगाळ राहील, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे.
काही भागातील कमाल तापमान
शिरूर ४१.६, तळेगांव ढमढरे ४१.४, कोरेगांव पार्क ४०.८, पुरंदर ३९.६, मगरपट्टा ३९.५, चिंचवड ३९.२, वडगांवशेरी ३८.७, शिवाजीनगर आणि पाषाण ३८.६, हवेली ३८.१, एनडीए ३७.८, बारामती ३७.७, तळेगांव ३६, माळीण ३४





