Pune : पीएमपी तिकिटावर पुरुष-महिला नोंद

सागर येवले
पुणे – पीएमपी बसने दररोज लाखो प्रवाशी प्रवास करतात. मात्र, या प्रवाशांमध्ये किती पुरुष, महिला आणि लहान मुले प्रवास करतात याची माहिती मिळण्यासाठी पीएमपीकडून तिकिटावर नोंदी घेण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार दैनंदिन प्रवाशी संख्या दहा ते अकरा लाख असून, त्यामध्ये सरासरी दैनंदिन पुरुष प्रवासी संख्या साडेपाच ते सहा लाख आणि महिला प्रवासी संख्या साडेचार ते पावणेपाच लाख इतकी असल्याचे दिसून येते.
पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपी) पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीएच्या कार्यक्षेत्रात ३८१ मार्गावर सार्वजनिक बस सेवा दिली जाते. पुणेकरांची जीवनवाहिनी असलेल्या पीएमपीच्या साधारण १ हजार ६५० ते १ हजार ७०० बस मार्गावर धावतात. त्यामधून दररोज दहा ते अकरा लाख प्रवाशी प्रवास करतात.
पीएमपीकडून प्रवाशांच्या व प्रशासनाच्या सोईसाठी २०१०-२०११ च्या सुमारास ई-तिकीट मशिन सुरू केले. त्यामुळे एकूण तिकीट विक्रीच्या नोंदी, तिकीट विक्रीतून मिळणारी रक्कम अशी विविध माहिती तत्काळ मिळणे शक्य झाले.
पीएमपीने दि. १ ऑक्टोंबर २०२३ रोजी गुगल-पे, फोन-पे द्वारे ऑनलाईन क्युआरकोडद्वारे तिकीटाचे पैसे देण्याची सुविधा सुरू केली. त्यामुळे प्रवाशांचे रोख रक्कम आणि सुट्टे पैसे बाळगण्याची चिंता मिटली आणि प्रवाशी-वाहक यांच्यातील वादही संपले.
आतापर्यंत ई-तिकीट मशीनवर तिकीट काढताना प्रवाशी बसलेले ठिकाण आणि जाण्याचे ठिकाण टाकून तिकीट काढता येत होते. मात्र, आता एप्रिल २०२५ पासून तिकीट काढताना पुरुष व महिला प्रवाशांची नोंद व्हावी अशा सूचना पीएमपीच्या अध्यक्ष दीपा मुधोळ-मुंडे यांनी दिल्या. त्यानुसार मागील तीन महिन्यांपासून या नोंदी केल्या जात आहे.
पीएमपीतून किती महिला व पुरुष प्रवास करतात, याची नोंद पीएमपीकडे नव्हती. त्यामुळे महिलांसाठी योजना राबविताना पीएमपीला अडचणी येत होत्या. त्यानुसार एप्रिल महिन्यात जवळपास पावणेदोन लाख पुरुष तर दीड लाख महिला प्रवाशांनी प्रवास केल्याचे दिसून आले.
तर इतर प्रवाशांमध्ये २२ हजारांपेक्षा अधिक संख्या होती. त्यानुसार मागील तीन महिन्यांत बसने प्रवास करणाऱ्यांमध्ये ५५ ते ५८ टक्के पुरुष प्रवाशी आणि ४२ ते ४५ टक्के महिला प्रवाशांचे असल्याचे दिसून येते.
माहितीचा पीएमपीला होणार असा फायदा
– दैनंदिन महिला, पुरुष प्रवाशांची संख्या समजणार
– बसचे नियोजन करण्यासाठी माहितीचा वापर
– भविष्यात महिला, पुरुष आणि लहान मुलांसाठी विविध योजनांसाठी माहितीचा उपयोग
– महिलांसाठी विशेष बस सुविधा सुरू करण्यासाठी माहितीचा उपयोग होणार






