PUNE: सहकारी गृहनिर्माण संस्थांची सदस्य संख्या घटवली

पुणे – राज्यातील छोट्या सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या बाबतीत मोठा निर्णय घेतला आहे. 35 सदस्यांपेक्षा कमी सदस्य संख्या असणाऱ्या सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या व्यवस्थापन समिती सदस्य संख्या ही यापूर्वी 11 होती. आता यामध्ये शासनाने बदल करून व्यवस्थापन समितीची सदस्य संख्या 5 इतकी केली आहे. त्यामुळे या निर्णयाचा फायदा राज्यातील सुमारे 50 हजार गृहनिर्माण संस्थांना होणार आहे.
छोट्या सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या कामकाजामध्ये सुसूत्रता येण्यासाठी व्यवस्थापन समितीच्या सदस्यांची संख्या 11 इतकी होती. 35 सदस्यांपेक्षा कमी सदस्य संख्या असनार्या गृहनिर्माण संस्थांच्या बाबतीत शिथिल करण्याच्या संदर्भात सहकार आयुक्त यांच्या स्तरावरील कायदा सुधारण सभेमध्ये तपशीलवार विचारविनिमय करण्यात आला.
महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 154 ब (19) (1) मध्ये व्यवस्थापन समिती ही राज्य शासन राजपत्रातील अधिसूचनेद्वारे सर्वसाधारण किंवा विशेष आदेशाद्वारे वेळोवेळी ठरवील, इतक्या सदस्यांची मिळून बनलेली असेल, अशी तरतूद आहे. तसेच गृहनिर्माण संस्थांकरीता तयार केलेल्या आदर्श उपविधीच्या प्र्करण 12 मध्ये सहकारी संस्थांच्या व्यवस्थापनाच्या दृष्टीने व्यवस्थापकीय समितीची संक्ल्ह्या निश्चित केलेली आहे.
यामध्ये सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या 100 सदस्यांपर्यंत व्यवस्थापन समितीच्या सदस्यांची संख्या 11 इतकी आहे. तर 101 ते 200 सदस्यांपर्यंत 13 , 201 ते 300 सदस्यांपर्यंत 15, 301 ते 500 सदस्यांपर्यंत 17 आणि 501 ते अधिक सदस्य असेल तर व्यवस्थापन समितीच्या सदस्यांची संख्या 19 इतकी यापूर्वी निश्चित केलेली आहे. आता यामध्ये बदल करून 35 सदस्य असलेल्या सोसायटीमध्ये व्यवस्थापन समितीची सदस्य संख्या 5 इतकी निश्चित केली आहे, याबाबतचा शासन निर्णय सहकार व पणन विभागाचे उपसचिव नितीन गायकवाड यांनी जारी केला आहे.





