Pune : भूमिअभिलेख विभागात मेगा भरती!

पुणे – शासकीय नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे. राज्य शासनाच्या भूमिअभिलेख विभागाने गट ‘क’ संवर्गातील भूकरमापक या पदांसाठी ९०३ जागांची भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या पदांसाठी इच्छुकांना दि. 1 ते दि. 24 ऑक्टोंबर 2025 पर्यंत अर्ज करता येणार आहे.
भूमिअभिलेख विभागात रिक्त असलेल्या एकूण १ हजार १६० पदांपैकी ९०३ पदे सरळसेवेने भरण्यास शासनाने आॉगस्ट 2025 रोजी मान्यता दिली. त्यानुसार या पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. पुणे विभागात 83, कोकण विभागात 259, नाशिक विभागात 124, छत्रपती संभाजीनगर 210, अमरावती विभागात 117, नागपूर विभागात 110 भूकरमापकांची पदे भरण्यात येणार आहे. या पदांसाठी भरती परीक्षा संभाव्य नियोजन केले असून, त्यानुसार दि. 13 व 14 नोव्हेंबर 2025 ही परीक्षा नियोजित आहे, अशी माहिती भूमिअभिलेख विभागाचे जमाबंदी आयुक्त डॉ. सुहास दिवसे यांनी दिली.
भूकरमापक पदासाठी इच्छुक उमेदवारांनी https://ibpsreg.ibps.in/gomsep25/ किंवा https://mahabhumi.gov.in या संकेतस्थळांवरून आपले ऑनलाइन अर्ज वेळेत सादर करावेत, असे आवाहन भूमिअभिलेख विभागाकडून करण्यात आले आहे. या पदासाठी मान्यताप्राप्त अभियांत्रिकी महाविद्यालयातील किंवा संस्थेकडील स्थापत्य अभियांत्रिकी पदविका असणे आवश्यक आहे किंवा दहावी उत्तीर्ण झाल्यावर मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे सर्वेक्षक व्यवसायाचे प्रमाणपत्र (आयटीआय सर्वेअर) झालेला असावा, असेही भूमिअभिलेख विभागाकडून सांगण्यात आले आहे.





