Manjusha Nagpure : महापौरपदी बिनविरोध निवड झाल्यानंतर पीठासन अधिकारी म्हणून उपस्थित असलेल्या जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिलेला पुष्पगुच्छ महापौर मंजुषा नागपुरे यांनी नम्रपणे स्वीकारण्यास नकार दिला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे महापौर व उपमहापौर पदाची निवड होत असली, तरी कोणतेही सत्कार किंवा जल्लोष न करता साधेपणाने ही निवड प्रक्रिया पार पाडण्याचा निर्णय भाजपकडून यापूर्वीच जाहीर करण्यात आला होता. पक्षाचा हा आदेश शिरसावंद्य असल्याचे सांगत सत्कारासाठी पुष्पगुच्छ स्वीकारला नसल्याचे नागपुर यांनी स्पष्ट केले. मात्र, शुभेच्छा स्वीकारत त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना नमस्कार केला. महापौरांच्या या कृतीमुळे क्षणभर गोंधळलेल्या जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या भूमिकेचे कौतुक करत, आमच्याकडूनही असे व्हायला नको, अशी भावना व्यक्त केली आणि त्याच आपुलकीने महापौरांच्या निर्णयाचा स्वीकार केला. यावेळी उपस्थित असलेल्या महापालिका आयुक्तांसह महापालिकेचे पदाधिकारी आणि अन्य अधिकाऱ्यांनीही महापौर मंजुषा नागपुरे यांच्या या संयमित आणि संवेदनशील भूमिकेचे कौतुक केले.