Pune Mayor Election : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेश कलमाडी तसेच ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर पुण्याच्या राजकारणाने सोमवारी संवेदनशीलता आणि संयमाचा अनोखा प्रत्यय दिला. या दुःखद घटनेनंतर भाजपने कोणतीही मिरवणूक अथवा जल्लोष साजरा करणार नसल्याचे जाहीर केले होते. तसेच महापौर , उपमहापौरांच्या अभिनंदनाचा ठराव केवळ एका ओळीत मांडण्याचा निर्णय भाजपने घेतला. भाजपचे गटनेते गणेश बिडकर यांनी दोन दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी, तसेच काँग्रेस नेत्यांना आपले उमेदवार मागे घ्यावेत, असे आवाहन केले होते. त्यानंतर या पक्षांनी वरिष्ठ पातळीवर संपर्क साधत भूमिका स्पष्ट केली. राजकीय स्पर्धेपेक्षा शोकभावनेला प्राधान्य देत, या पक्षांनी भाजपच्या आवाहनाला प्रतिसाद दिला. परिणामी, महापालिकेतील महापौर, उपमहापौरपदाची निवडणूक बिनविरोध पार पडली. सत्तासंघर्ष, आरोप-प्रत्यारोप आणि राजकीय तणावासाठी ओळखल्या जाणाऱ्या निवडणूक प्रक्रियेत आज मात्र शांतता, संवेदना आणि सामंजस्य दिसून आले. दुःखाच्या क्षणी राजकारण बाजूला ठेवत सर्व पक्षांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतल्याने पुण्याच्या राजकीय संस्कृतीचा एक सकारात्मक पैलू समोर आला. “पुण्याने वेगळी राजकीय संस्कृती जपली आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी खासदार सुरेश कलमाडी यांच्या प्रती संवेदना व्यक्त करत सर्वपक्षीय नेत्यांनी महापौर-उपमहापौर पदाची निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय एकमताने घेतला. शहराच्या राजकीय संस्कृतीचे हे उदाहरण आहे. महापालिका निवडणुकीतील विजय ही जबाबदारी असून, पुणेकरांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे काम भाजपचे सर्व नगरसेवक करतील.” – मुरलीधर मोहोळ, केंद्रीय राज्यमंत्री, खासदार अजित पवार “दिवंगत अजित पवार यांच्या निधनामुळे निवडीनंतर कोणताही जल्लोष अथवा मिरवणूक काढायची नाही, असा निर्णय भाजपने घेतला होता. दिवंगत अजित पवार, सुरेश कलमाडी तसेच डॉ. बाबा आढाव यांच्या निधनाने राजकारणाची भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे. हे नेते शहराच्या विकासाचे शिल्पकार होते. ही बाब लक्षात घेऊन काँग्रेस, राष्ट्रवादीकडे अर्ज माघारी घेण्याची विनंती केली होती. त्यांनीही त्याला सकारात्मक प्रतिसाद देत शहराच्या राजकीय संस्कृतीचा वारसा जपला आहे.” – गणेश बिडकर, गटनेते, भाजप “भाजपने यापूर्वीच दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे कोणताही आनंदोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला होता. निवडीनंतर स्वर्गीय अजित पवार, सुरेश कलमाडी तसेच डॉ. बाबा आढाव यांच्यासाठी श्रद्धांजली सभा घेण्याचा निर्णय झाला होता. या सभेत नगरसेवकांना आपल्या भावना व्यक्त करायच्या होत्या. त्यामुळे भाजपच्या भावनिक आवाहनाला प्रतिसाद देणे संयुक्तिक वाटल्याने पक्षाच्या दोन्ही उमेदवारांचे अर्ज मागे घेत सभागृहाची राजकीय गरिमा राखण्याचा प्रयत्न केला आहे.” – ॲड. निलेश निकम, गटनेते, राष्ट्रवादी काँग्रेस “काँग्रेसने दोन्ही पदांसाठी अर्ज भरले होते. बहुमत भाजपचे असले तरी निवडणूक लढविण्याचे ठरवले होते. भाजपने दिवंगत अजित पवार, सुरेश कलमाडी तसेच डॉ. बाबा आढाव यांच्या निधनामुळे निवडणूक जिंकली तरी कोणताही जल्लोष साजरा करणार नाही, तसेच कोणताही सत्कार स्वीकारला जाणार नाही, असे स्पष्ट केले होते. त्यामुळे आम्हीही त्याला सकारात्मक प्रतिसाद देत दोन्ही उमेदवारांचे अर्ज मागे घेतले.” – ॲड. रामचंद्र उर्फ चंदूशेठ कदम, गटनेते, काँग्रेस