Pune News : जेष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव सत्यशोधक शिक्षक पुरस्काराने सन्मानित

प्रभात वृत्तसेवा
पुणे – समाज परिवर्तनासाठी आयुष्यभर झगडणारे ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांना सत्यशोधक शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. हा पुरस्कार येत्या रविवारी (दि.२८) श्री शिवाजी मराठा सोसायटीच्या खासेसाहेब पवार सभागृहात ज्येष्ठ सत्यशोधक उत्तमराव (नाना) पाटील यांच्या हस्ते प्रदान केला जाईल.शाक्त शिवराज्याभिषेक, सत्यशोधक समाज स्थापना दिन आणि संविधानाचे अमृत महोत्सवी वर्ष सोहळा समितीने हा कार्यक्रम आयोजित केला आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटन माजी सनदी अधिकारी महेश झगडे यांच्या हस्ते होणार असून, अध्यक्षस्थानी शेतकरी उद्योजक राजकुमार धुरगुडे असतील. श्री शिवाजी मराठा सोसायटीचे सचिव अण्णा थोरात स्वागताध्यक्ष म्हणून सहभागी होतील. प्रमुख पाहुण्यांमध्ये सामाजिक कार्यकर्त्या अबेदा इनामदार, माजी महापौर वैशाली बनकर, तसेच कमल व्यवहारे यांचा समावेश आहे.
विशेष अतिथी म्हणून भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे सचिव संदीप कदम, अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या सचिव प्रमिला गायकवाड, अभिनव शिक्षण संस्थेचे राजीव जगताप, मराठवाडा मित्र मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. भाऊसाहेब जाधव, कवी व लेखक प्रा. शरदचंद्र काकडे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे वंशज विलास साठे, उद्योजक किरण इंगोले, आर्किटेक्ट मारुतीराव जाधव हे उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमात विविध वैचारिक सत्रांचे आयोजन केले आहे. पहिल्या सत्रात शक्तीचा शिवराज्याभिषेक – शेतकरी व कष्टकरी जनतेला मिळालेली प्रेरणा या विषयावर शिवचरित्र अभ्यासक गंगाधर बनबरे विचार मांडतील. दुसऱ्या सत्रात सत्यशोधक समाजाची स्थापना – महात्मा फुलेंची भूमिका आणि आजची गरज या विषयावर विचारवंत कॉ. किशोर ढमाले मनोगत व्यक्त करतील.
वैचारिक संवाद सत्रात बारामती प्रणाली शिक्षण संस्थेचे बुवासाहेब हुंबरे उद्घाटक असतील तर अध्यक्ष म्हणून सत्यशोधक समाज संघाचे संयोजक अरविंद खैरनार मार्गदर्शन करतील. विशेष सत्रात संविधान संस्कृती व बहुजन क्रांती या विषयावर संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड संवादक म्हणून उपस्थित राहतील. या सत्राच्या अध्यक्षस्थानी अभिनेते किरण माने भूषवणार आहेत.





