मार्केट यार्ड – पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केट यार्डात मोकाट जनावरांचा वावर वाढला आहे. गाळ्यांसमोर टाकलेल्या फळभाज्यांसह पालेभाज्यांवर जनावरे ताव मारत असतात. बाजार परिसरात असा तरकारीचा चारा मिळत असल्याने भुसार बाजार हे जनावरांचे हक्काचे ठिकाण बनले आहे. मोकाट जनावरांकडून शहरात यापूर्वी हल्ल्याच्या घटना घडलेल्या असताना बाजारातील अशा मोकाट जनावरांच्या वावराकडे बाजार समितीचे दुर्लक्ष होत आहे. प्रशासन जनावरांकडून स्वच्छता मोहीम राबवून घेत आहे का? असा प्रश्नही बाजार घटकांकडून उपस्थित केला जात आहे. मार्केटयार्डात भुसार विभागासह तरकारी, कांदा-बटाटा व फळ विभागातही काही दिवसांपासून मोकाट जनावर फिरण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे बाजार घटकांना त्रास सहन करावा लागत आहे. बाजारातील व्यवहार सुरू असताना अशी जनावरे कळपाने वावरत आहेत. याखेरीज भुसार बाजारातही जनावरांचा वावर वाढला आहे. रस्त्याच्या मध्यभागी ठाण मांडून बसणे, उभे असणे असे प्रकार सर्वत्र दिसत आहेत. बाजारात गुरेढोरे सोडून वाहतूक व बाजारघटकांना अडचण निर्माण करणार्या मालकांविरुद्ध बाजार समितीने कारवाई करण्याची गरज आहे. मात्र, या समस्येपासून बाजार घटकांची सुटका करण्यात प्रशासन ठोस भूमिका घेत नसल्याने यात बाजार समिती प्रशासन अपयशी ठरल्याचे व्यापारी सांगतात. मोकाट जनावराने हल्ला केल्यास ? मार्केट यार्डात दररोज हजारो बाजार घटकांची वर्दळ असते. एखादे मोकाट जनावर उधळल्यास त्यातून कोणाला गंभीर दुखापत झाल्यास याला जबाबदार कोण ? शहरात अशा काही घटना घडल्या आहेत. बाजार घटकांवर हल्ला होण्याचा धोका कायम असल्याने या समस्येवर उपाय योजना करावी, अशी मागणी बाजार घटकांकडून होत आहे. ‘बाजार आवारात मोकाट फिरणार्या जनावरी जनावरे पकडण्यात येतील. कोणा खासगी व्यक्तींची असल्यास संबंधीतांवर कारवाई करण्यात येईल. अन्यथा ती महापालिकेकडे देण्यात येतील. याबाबत महापालिकेशी पत्रव्यवहार करून जनावरांची महाापलिकेच्या कोंडवाड्यात रवानगी करण्यात येईल. बाजार आवारात मोकाट जनावरे येऊ नये, यादृष्टीने प्रवेशद्वारावर आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतील.’ – डॉ. राजाराम धोंडकर, सचिव, पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती.