Pune Marathon 2024 : यंदाही इथिओपियाच्या धावपटूंचं वर्चस्व; आसेफा बिजुमेह, निगाटू तिसासुआ यांना विजेतेपदाचा मुकुट…

38th Pune International Marathon 2024 – पुणे मॅरेथॉनवर अपेक्षेप्रमाणे इथोपियाच्या खेळाडूंचे वर्चस्व राहिले. पुरुष विभागातून इथोपियाच्या आसेफा बिजुमेह आयलेनेहने प्रभावी 2:17:59 अशी वेळ नोंदवून विजेतेपदाला गवसणी घातली तर महिला गटातून निगाटू तिसासुआ बसाझिनने अव्वल स्थान पटकावले
मॅरेथॉनपटू आशिष कसौडेकर यांनी पूर्ण मॅरेथॉनला झेंडा दाखवून शर्यतीची सुरुवात केली. माजी उपमहापौर डॉ. सतीश देसाई, डीसीपी भाजीभाकरे, एसीपी राहुल आवारे यांनी प्रमुख शर्यतींना झेंडा दाखविला. केंद्रीय नागरी उड्डयन तथा सहाकार केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. यावेळी माजी आमदार रवींद्र धंगेकर, शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे, पुणे इंटरनॅशनल मॅरेथॉनच्या आयोजन समितीचे अध्यक्ष अभय छाजेड, बँक ऑफ महाराष्ट्रचे पुणे शहर विभागाचे विभागीय व्यवस्थापक डॉ. जावेद मोहनवी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
पुरुष विभागातून इथोपियाच्या आसेफा बिजुमेह आयलेनेहने अव्वल स्थान मिळविले. इथोपियाच्याच हुंडे डाबा केनेने द्वितीय तर केनियाच्या मैथ्या मिशेल क्यालोने तिसरे स्थान मिळविले. भारतीय गटामध्ये उत्तर प्रदेशचे ज्ञान बाबू यांनी अव्वल स्थान तर नाशिकचे कमलाकर देशमुख आणि गणेश बागुल या दोघांनी अनुक्रमे दुसरे आणि तिसरे स्थान पटकावले.
आंतरराष्ट्रीय महिलांच्या पूर्ण मॅरेथॉन गटामध्ये इथियोपियाच्या निगाटू तिसासुआ बसाझिनने अव्वल स्थान, इथिओपियाची सहकारी बेलेव एगर मेकोनेनने दुसरे स्थान पटकावले. भारतातील अश्विनी मदन जाधव हिने आंतरराष्ट्रीय स्पर्धेत तिसरे आणि भारतीय मॅरेथॉनर्सच्या यादीत पहिले स्थान पटकावले. महिलांच्या अर्ध मॅरेथॉनने रत्नागिरीच्या साक्षी संजय जड्यालने अव्वल स्थान पटकावले, त्यानंतर हरियाणातील भारती आणि वसईच्या अर्चना लक्ष्मण जाधव यांनी अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावला. स्पर्धेतील विजेत्यांना महापालिकेकडून 35 लाख रुपयांची पारितोषिकं देण्यात आली.





