pune mandai : मंडईतील गाळ्यांच्या भाडेवाढीचा पुनर्विचार करा
pune mandai :

नगरसेवक राघवेंद्र मानकर यांची मागणी
pune mandai : फुले मंडईतील २२०० गाळेधारकांच्या भाडेवाढीचा पुनर्विचार करावा, अशी मागणी नगरसेवक, विश्रामबागवाडा प्रभाग समितीचे अध्यक्ष राघवेंद्र (बाप्पू) मानकर यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी स्थायी समिती अध्यक्षांना लेखी निवेदन दिले आहे.
गाळेधारकांची आर्थिक परिस्थिती, व्यवसायाचे स्वरूप आणि मागील काही वर्षांतील प्रतिकूल परिस्थितीचा विचार करून भाडे निश्चित करावे, असे त्यांनी म्हटले आहे.
करोनाकाळातील लॉकडाऊन, ग्राहकसंख्येतील घट तसेच मंडई परिसरातील मेट्रोसह विविध कारणांमुळे निर्माण झालेल्या समस्यांचा व्यवसायावर परिणाम झाला. यातून गाळेधारक अद्याप सावरलेले नसताना वाढीव भाड्याचा अतिरिक्त भार त्यांच्यावर पडत असल्याचे मानकर यांनी निवेदनात नमूद केले आहे. यावेळी मंडई व्यापारी संघटनेचे अध्यक्ष राजाभाऊ कासूर्डे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
भाडे निश्चित करण्यापूर्वी गाळेधारकांच्या प्रतिनिधींचे म्हणणे ऐकून घ्यावे. करोना, अन्य कारणांमुळे आर्थिक अडचणीत आलेल्या गाळेधारकांच्या २०२१ ते २०२५ पाच वर्षांतील थकीत भाड्यांमध्ये सवलत द्यावी. थकीत भाडे हप्त्यांमध्ये भरण्याची सवलत द्यावी, अशीही मागणी निवेदनात केली आहे.
मंडईत व्यवसाय करणाऱ्या गाळेधारकाचे हित जपणे आवश्यक आहे. मुंबई, दिल्लीतील भाडेनिश्चितीच्या पद्धतीचा अभ्यास करावा. गाळेधारकांना विश्वासात घेऊन, त्यांचे म्हणणे ऐकून घ्यावे.
राघवेंद्र मानकर, नगरसेवक





