Pune Mahila Congress : ‘नीट’ पेपरफुटीविरोधात महिला काँग्रेस आक्रमक! थेट ‘या’ मंत्र्याची हकालपट्टी करण्याची मागणी
Pune Mahila Congress : 'नीट' परीक्षा, पेपरफुटीमुळे रद्द झाल्याच्या निषेधार्थ पुणे शहर महिला काँग्रेसतर्फे बिबवेवाडी येथे तीव्र आंदोलन करण्यात आले.
Updated On:

Pune Mahila Congress – नीटची परीक्षा पेपर फुटीमुळे रद्द करावी लागली, ही सरकारची नामुष्की आहे. नीट परीक्षा त्याच्या निषेधार्थ पुणे शहर महिला काँग्रेसच्या वतीने बिबवेवाडी येथे आंदोलन करण्यात आले. पुणे शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा स्वाती शिंदे, उपाध्यक्षा प्राजक्ता जाधव यांच्या नेतृत्वाखाली रविवारी आंदोलन करण्यात आले. महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय समन्वयक प्रिया वंदनाजी यांच्यासह अनिता मकवाना, अंजली सोलापुरे, ऍड. भावना बोराटे, रेखा जैन, अंजली देसाई ज्योती अडागळे आदी कार्यकर्त्या, पदाधिकारी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.
वैद्यकीय अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे नीटची परीक्षा घेतली जाते. ही परीक्षा पेपर फुटीमुळे रद्द करण्यात आली. वैद्यकीय शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचा अपेक्षाभंग झाला. २३ लाख विद्यार्थ्यांना प्रचंड मन:स्ताप सहन करावा लागला. याबद्दल केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करावी. गेल्या १० वर्षांत पेपरफुटीचे प्रकार ७० हून अधिक वेळा घडले आहेत. सरकारची नामुष्की जनतेपुढे मांडायला हवी, असेही आंदोलनकर्त्यांनी नमूद केले आहे.





